
अनेकदा सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अचानक डोके गरगरू लागते, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा काही क्षणांसाठी शरीर अगदी हलके झाल्यासारखे वाटते. बहुतेक लोक या समस्येकडे थकवा, अपुरी झोप किंवा शारीरिक कमजोरी समजून दुर्लक्ष करतात. मात्र, सकाळी उठल्याबरोबर वारंवार चक्कर येणे ही केवळ एक साधी तक्रार नसून, ती शरीरातील एखाद्या गंभीर आजाराची पूर्वसूचना असू शकते. वैद्यकीय दृष्ट्या या स्थितीला शास्त्रीय भाषेत 'ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन' असे म्हटले जाते ( याला पोस्टरल हायपोटेन्शन देखील म्हणतात. ) आणि याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
काय आहे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन?
जेव्हा आपण झोपलेल्या अवस्थेतून किंवा बसलेल्या स्थितीतून अचानक उभे राहतो, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्त खालच्या दिशेला वेगाने जाते. अशा वेळी शरीर रक्ताभिसरण आणि रक्तदाब (ब्लड प्रेशर) त्वरित संतुलित करू शकले नाही, तर मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा काही क्षणांसाठी कमी होतो. या स्थितीलाच 'ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन' असे म्हणतात. ही समस्या प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, शरीरात पाण्याची कमतरता असलेले लोक किंवा विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

चक्कर येण्याची प्रमुख कारणे
सकाळी चक्कर येण्यामागे शरीरातील पाण्याची कमतरता हे एक मुख्य कारण असू शकते. रात्रभर झोपेत असताना शरीरातील पाण्याचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते. अशातच जर दिवसाही पुरेसे पाणी प्यायले नसेल, तर सकाळी उठल्यावर रक्तदाब अचानक कमी होऊन चक्कर येते. तसेच, रक्तातील साखरेचे प्रमाण (लो ब्लड शुगर) कमी होणे हे देखील एक कारण आहे. विशेषतः मधुमेहाचे रुग्ण जे इन्सुलिन किंवा औषधे घेतात, त्यांच्यामध्ये 'हायपोग्लायसेमिया'मुळे सकाळी अशक्तपणा आणि चक्कर जाणवू शकते.
याशिवाय, उच्च रक्तदाब, नैराश्य (डिप्रेशन) किंवा हृदयविकारावरील काही औषधांचे दुष्परिणाम म्हणूनही ही समस्या उद्भवू शकते. जर रात्री झोपेत श्वास घेण्यास अडथळा येत असेल, ज्याला 'स्लीप एपनिया' म्हणतात, तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने सकाळी उठल्यावर डोके जड वाटू शकते. कानाच्या आतील भागात सूज किंवा संसर्ग असल्यास शरीराचा समतोल बिघडतो, ज्यामुळे उठल्यावर तीव्र चक्कर येते.

अशी घ्या काळजी
सकाळी उठल्यावर होणारा हा त्रास टाळण्यासाठी काही साध्या सवयी बदलणे आवश्यक आहे. झोपेतून उठल्यावर घाईघाईने उभे न राहता, आधी काही मिनिटे अंथरुणावर बसून राहावे आणि मग हळूच उठावे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी. रात्रीच्या वेळी मद्यपान किंवा कॅफिनचे अतिसेवन टाळावे आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी सकाळी वेळच्या वेळी नाश्ता करावा. जर या उपायांनंतरही त्रास कमी होत नसेल किंवा चक्कर येण्याचे प्रमाण वाढत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

वरील लेख केवळ माहितीपर असून. आरोग्यविषयक कोणत्याही समस्या जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.