भारतीय तरुणांचे मानसिक आरोग्य धोक्यात; जागतिक क्रमवारीत ६० व्या स्थानी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27th February, 06:06 pm
भारतीय तरुणांचे मानसिक आरोग्य धोक्यात; जागतिक क्रमवारीत ६० व्या स्थानी

नवी दिल्ली : भारतीय तरुणांचे (Indian youth) मानसिक आरोग्य (Mental Health) धोक्यात असून, ‘ग्लोबल माइंड हेल्थ २०२५’ (Global Mind Health 2025) या आंतरराष्ट्रीय अहवालातून (International report)  ही बाब पुढे आली आहे.

१८ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्यासंदर्भात भारत जगात ६० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या अहवालात जगभरातील ८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतीय तरुणांचा ‘माइंड हेल्थ कोशंट (एमएचक्यू  )  केवळ ३३ इतका नोंदवण्यात आला आहे. 

एक धक्कादायक गोष्ट या अभ्यासाअंतर्गत उघड झाली आहे. देशातील तरुणांचा एमएचक्यू स्कोअर ३३ आहे तर ५५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एमएचक्यू स्कोअर ९६ इतका नोंदवण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार जागतिक क्रमवारीत ज्येष्ठ नागरिक ४९ व्या स्थानी आहेत. तरुण पिढीच्या तुलनेत जुनी पिढी मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्थिर असल्याचे या आकडेवरून दिसून येत आहे. 

मानसिक आरोग्य धोक्यात येण्याची प्रमुख कारणे

१. स्मार्टफोन हातात येण्याचे सरासरी वय १६.५ वर्षे आहे. मुलांच्या एकाग्रतेवर व भावनिक नियंत्रणावर स्क्रीनच्या अतिवापरामुळे परिणाम होत आहे. 

२. ‘अल्ट्रा प्रोसेस्ड फूड’ खाण्याचे प्रमाण भारतीय तरुणांमध्ये ४४ टक्के एवढे आहे. मेंदूच्या आरोग्यावर आणि मूडवर चुकीच्या आहारामुळे विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

३. कुटुंबाशी जवळीक वाटण्याचे प्रमाण तरुणांमध्ये ६४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ७८ टक्के एवढे आहे. तरुणांना कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा कमी झाल्याने ते एकटे पडत आहेत.

४. आर्थ‌िक अन‌िश्चितता, करिअरची स्पर्धा व सामाजिक अपेक्षांमुळे तरुणांच्या मानसिक लवचिकतेवर परिणाम होत आहे. 

आरोग्यापुरता मर्यादित हा अहवाल नसून देशाच्या उत्पादकतेशी संबंधित आहे. तरुणांचे मानसिक स्वास्थ्य ढासळल्यास त्याचा थेट परिणाम देशाची अर्थव्यवस्था व सामाजिक रचनेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा