न्यूझीलंडवर थरारक मात : रेहान अहमदची अष्टपैलू खेळी, विल जॅक्सची फटकेबाजी

कोलंबो : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत इंग्लंडने आपला दबदबा कायम राखला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने सुपर-८ मध्ये विजयाची 'हॅट्रिक' पूर्ण करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडची वाटचाल खडतर झाली असून, त्यांच्या पराभवाचा फायदा घेत पाकिस्तानची सेमीफायनलची समीकरणे पुन्हा जिवंत झाली आहेत.
न्यूझीलंडची दमदार सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. सलामीवीर टिम सीफर्ट (३५) आणि फिन अॅलन (२९) यांनी ४२ चेंडूंमध्ये ६४ धावांची वेगवान सलामी दिली.
इंग्लंडचा कमबॅक
पॉवरप्लेनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. ७ व्या आणि ८ व्या षटकात सलामीवीरांना बाद करून कीवींना बॅकफूटवर ढकलले. रचिन रवींद्र (११) आणि डॅरेल मिचेल (३) स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सने २८ चेंडूंत ३९ धावांची खेळी करत संघाला २० षटकांत ७ बाद १५९ धावांपर्यंत पोहोचवले.
इंग्लंडची प्रभावी गोलंदाजी
अनुभवी आदिल रशीद, विल जॅक्स आणि रेहान अहमद या तिघांनीही प्रत्येकी २-२ बळी मिळवून कीवींच्या धावगतीवर अंकुश ठेवला.
इंग्लंडची खराब सुरुवात
१६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था बिकट झाली होती. न्यूझीलंडने पहिल्या २ षटकांमध्ये इंग्लंडच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. फिलिप सॉल्ट याने २ धावा करून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर जोस बटलर याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचे चाहते चिंतेत पडले होते.
मधल्या फळीने इंग्लंडला सावरले
त्यानंतर इंग्लंडच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी २० पेक्षा अधिक धावा करत सामन्यातील आव्हान कायम ठेवले. मात्र न्यूझीलंडनेही विकेट घेऊन इंग्लंडला आपल्यावर वरचढ होऊन दिले नाही. कॅप्टन हॅरी ब्रूक याने २६, जेकब बेथल याने २१, सॅम करन याने २४ तर टॉम बँटन याने ३३ धावांचे योगदान देत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. टॉम बँटन आऊट झाल्याने इंग्लंडची धावसंख्या १६.५ षटकांत ६ बाद आऊट ११७ अशी झाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी १९ चेंडूत ४३ धावांची गरज होती.
रेहान अहमद, विल जॅक्सचा ‘चाबूक’ प्रहार
सामना शेवटच्या टप्प्यात असताना इंग्लंडला विजयासाठी मोठी फटकेबाजी आवश्यक होती. अशा वेळी युवा खेळाडू रेहान अहमद आणि विल जॅक्सने १६ चेंडूंमध्ये ४४ धावांची वादळी भागीदारी करून सामन्याचा नूर पालटला. रेहानने केवळ फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही चमक दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडने ३ चेंडू राखून १६१ धावा केल्या आणि रोमहर्षक विजय मिळवला.
रचीन रवींद्रचे ३ विकेट्स
न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री, लॉकी फर्ग्यूसन आणि ग्लेन फिलीप्स या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. मात्र याचा काही फायदा झाला नाही.
सेमीफायनलची गणिते बदलली
न्यूझीलंडच्या या पराभवामुळे ग्रुप-२ मधील समीकरणे रंजक झाली आहेत. इंग्लंड सलग ३ विजयांसह ६ गुण मिळवून अव्वल स्थानी राहिला. न्यूझीलंड ३ गुणांसह दुसऱ्या स्थानी, पण आता त्यांना धावगतीची चिंता राहणार आहे. कारण जर पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवले आणि त्यांचा रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला झाला, तर पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
पाकिस्तानला उपांत्य फेरीची संधी
पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर ३ गुण होतील. आता पाकिस्तानने २ सामन्यापैकी एक सामना गमावला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे १ गुण आणि नेट रनरेट हा -०.४६१ आहे. पाकिस्तानला आता विजयासोबत नेट रनरेटचे गणित सोडवणे भाग आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी आली तर सामना ६५ धावांनी जिंकावा लागेल. पहिल्यांदा गोलंदाजी आली तर दिलेले टार्गेट १३.२ षटकांत पूर्ण करावे लागेल. तेव्हाच विजयासह नेट रनरेटचे गणित सुटेल.
........
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १५९ धावा.
इंग्लंड : १९.३ षटकांत ६ बाद १६१ धावा.
सामनावीर : विल जॅक्स
टी-२० विश्वचषक : शेवटच्या ३ षटकांत सर्वाधिक धावा
- ४८ धावा : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, ग्रॉस इसलेट, २०१० (उपांत्य फेरी)
- ४८ धावा : भारत वि. पाकिस्तान, मेलबर्न, २०२२
- ४३ धावा : इंग्लंड वि. न्यूझीलंड, कोलंबो २०२६*
- ४१ धावा श्रीलंका वि. भारत, ग्रॉस इसलेट, २०१०
टी-२० विश्वचषक : फिरकीपटूंनी टाकलेली सर्वाधिक षटके
- ३१ षटके : भारत वि. पाकिस्तान, कोलंबो, २०२६
- ३१ षटके : न्यूझीलंड वि. इंग्लंड, कोलंबो, २०२६*
- ३० षटके : श्रीलंका वि. न्यूझीलंड, कोलंबो, २०२६
- २६ षटके : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, कोलंबो २०१२
- २५.४ षटके : भारत वि. वेस्ट इंडिज, मीरपूर, २०१४