दृष्ट‌िहीन तान्याची नेत्रदिपक कामगिरी

देशातील पहिल्या दृष्ट‌िहीन न्यायाधीश बनण्या पर्यंतचा प्रवास

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
दृष्ट‌िहीन तान्याची नेत्रदिपक कामगिरी

पुणे : दृष्ट‌िहीन असूनही नेत्रदिपक कामगिरी करून देशातील पहिल्या दृष्ट‌िहीन न्यायाधीश बनलेल्या तान्या नाथन सी. (Tanya Nathan C. First Blind Woman Judge) यांचा सध्या देशात डंका गाजत आहे. अनेकजण परिस्थितीपुढे हात टेकत असताना; तान्याने एक नवा आदर्श घालून दिला आहे.  जिद्द, चिकाटी आणि आपल्या स्वप्नांना प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास कुठल्याही कठीण परिस्थितीवर मात करणे; अशक्य नाही, हा संदेश तान्याने आपल्या नेत्रदिपक यशाने दिला आहे. 

पुणे येथील दीपस्तंभ फाउंडेशनने देशातील पहिल्या दृष्टिहीन न्यायाधीश बनलेल्या तान्या नाथन सी. यांचा गौरव सोहळा घडवून आणला.  या सोहळ्यात तान्याने आपला वकील ते न्यायाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला आहे. 

तान्याने सांगितले की, ‘केरळमधील कन्नूरमध्ये शिक्षण झाले. कुटुंबात आई वडील, दोन बहिणी. वकिल बनण्यासाठी प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वकिली करणे सुरू केले. वाटले होते की, दृष्टिहीन असल्याने इतर वकिलांकडून सहकार्य मिळणार नाही. मात्र, सहकाऱ्यांनी चांगले प्रोत्साहन दिले. 

ज्येष्ठ वकील सुनीलकुमार यांचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी न्यायाधीशपदासाठी अपंग उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परीक्षा देण्याचे निश्च‌ित केले. दृष्ट‌िहीन उमेदवारांसाठी मार्गदर्शनपर विधीविषयक पुस्तकांची उपलब्धता, नव्याने झालेले कायदेबदल याचाही सखोल अभ्यास केला.

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे साध्य केल्याचे तान्या यांनी कार्यक्रमात सांगितले. त्यांचा हा यशस्वी प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणे कष्ट केल्यास कठीण परिस्थितीवर मात करीत यश संपादन करणे अशक्य नाही, हेच यातून दिसून येते. 

हेही वाचा