मडकईची श्री नवदुर्गा देवी

आख्यायिकेनुसार, देवी गावच्या साेनाराची लेक आहे. तीसुद्धा अष्टमीच्या दिवशी माहेरी जाते. दिवसभर थांबून मानपान स्वीकारून मंदिरात येते. त्यामुळे सासुरवाशीण लेकींनी जत्रेच्या दिवशी माहेरी येण्याची परंपरा राखून ठेवलेली आहे.

Story: जत्रा |
3 hours ago
मडकईची  श्री नवदुर्गा देवी

फोंडा तालुक्यातील मडकई गावात वसलेले श्री नवदुर्गा मंदिर हे नावाजलेले प्रसिद्ध मंदिर. या देवीला ‘वामग्रीवा श्री नवदुर्गा’ असेही म्हणतात. यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. नवसाला पावणारी आणि संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावत जाणारी, असा देवतेचा नावलाैकिक असल्याने संकटात सापडलेल्या एका भक्ताने देवीला नवस केला. ‘माते, माझ्यावर माेठे संकट काेसळले आहे आणि ते निवारण करण्याची शक्ती फक्त तुझ्यातच आहे. माते, माझ्यावरील संकट निवारण केलेस तर पुढच्याच जत्रेत मी तुला हजार रुपयांची फुले वाहीन’, असे म्हणून ताे देवतेवर भार टाकून माेकळा झाला. आश्चर्याची गाेष्ट म्हणजे चार दिवसांच्या अवधीत देवतेने त्याला संकटमुक्त केले. नवस फेडण्यासाठी म्हणून ताे जत्रेला निघाला. पण साधनसुविधांच्या अभावी चालत जावे लागल्याने जत्रेत पाेहाेचेपर्यंत त्याला उशीर झाला. ताे जेव्हा मंदिराजवळ पाेहाेचला, तेव्हा अर्धी रात्र उलटून गेली हाेती. जत्रा आटाेपून व्यापारी, फुगेवाले, फुलवाले परतीच्या वाटेला लागले हाेते. एक फुलवाली म्हातारी बाई आपली फुले संपवून परडी बाजूला ठेवून झाेपण्याच्या तयारीत हाेती. ताे तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, “आई फुले आहेत का?” त्यावर ती म्हातारी म्हणाली, “अरे, जत्रा तर मघाशीच उलगली. दुरून आलेला दिसताेस. लाेक घरीसुद्धा पाेहाेचले. मला म्हातारीला काळाेखात दिसत नाही. आता इथेच झाेपते. आता तुला फुले कुठेच सापडणार नाहीत.” असे म्हणून तिने परडी उचलून त्याच्यापुढे ठेवली. जवळच केराेसीनचा भगभगता दिवा पेटत हाेता. त्या प्रकाशात त्याची नजर त्या परडीत अडकलेल्या चाफ्याच्या पाकळीकडे गेली. बांबूच्या वेतापासून तयार केलेली ती परडी त्याने हातात घेतली. अडकलेली पाकळी हळुवार काढून घेतली. म्हातारीच्या हातावर हजार रुपयाच्या नाेटा ठेवून क्षणार्धात त्याने मंदिराकडे धाव घेतली. हर्षभरित मनाने हजार रुपयांची फुले देवीला अर्पण केली. हात जाेडले. डाेळे मिटले व म्हणाला, “देवते, उशिरा पोहाेचल्याबद्दल मला क्षमा कर. पण मी केलेला हजार रुपये फुलांचा नवस फेडीत आहे. पावन करून घेशील?” असे म्हणून त्याने डाेळे उघडले. देवीने मानेने हाेकार दिला हाेता. ताे आनंदित मनाने निघून गेला. पण त्या दिवसापासून देवीची मान वाकडी आहे. काेणी म्हणतात, हजार रुपयांच्या फुलाचा भार सहन न झाल्याने देवीची मान वाकडी झाली. काहीही असाे पण मंदिरात वामग्रीवा देवीची मूर्ती पहावयास मिळते.

देवदिवाळी झाली की, गावागावातून देवाचे जत्राेत्सव, दिवजाेत्सव सुरू हाेतात. श्री नवदुर्गा मातेचा उत्सव कार्तिक वद्य चतुर्थीपासून कार्तिक वद्य दशमीपर्यंत चालताे. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूजा-अर्चा असतात. त्याचबराेबर पारंपरिक कार्यक्रम चालू असतात. त्याचबराेबर पारंपरिक मयुरासन, गरुडासन, सुखासन, लालखी, नाैकाविहार, रथाेत्सव असे विविध कार्यक्रम चालू असतात. आसनात बसवून देवीची प्रकाशात मिरवणूक काढतात. सुवासिनी देवीची ओटी भरतात. दिवजाेत्सव साजरा करतात. विशेषतः लग्न करून दिलेल्या सर्व लेकी या दिवशी जत्रेला येतात.

गाेमंतकातील बहुतेक लाेक महानवमीच्या दिवशी मडकईच्या देवतेचा उपवास धरतात. नवमीच्या दिवशी देवीला महानैवेद्य असताे. याला ‘उफार’ असे म्हणतात. ‘उफार’ म्हणजे भात, वडे, भाजी, वरण, खीर असे अन्नपदार्थ शिजवून पारंपरिक पद्धतीने बांबूपासून तयार केलेल्या टाेपल्यांत भरून देवळात आणतात व देवळाच्या चाैकात ठेवतात. हा नैवेद्य नंतर सर्व लाेक जेवतात. ‘उफार’ हाेईपर्यंत दुपारचे तीन ते चार वाजतात. त्यामुळे उपास धरलेले लाेक दुपारी न जेवता रात्री जेवतात.

मडकई गावातील सर्व लेकी महानवमीचा उपवास करतात. जत्रेला उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घेतात. आख्यायिकेनुसार, देवी गावच्या साेनाराची लेक आहे. तीसुद्धा अष्टमीच्या दिवशी माहेरी जाते. दिवसभर थांबून मानपान स्वीकारून मंदिरात येते. त्यामुळे सासुरवाशीण लेकींनी जत्रेच्या दिवशी माहेरी येण्याची परंपरा राखून ठेवलेली आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे रथ पारंपई येथे जाताे. यावेळी ‘श्री नवदुर्गे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी’ असे म्हणत रथ नाचवतात. त्यानंतर रथ देवीच्या प्रकटस्थळी तळेखाेल येथे जाताे. रथ पुनःश्च मंदिरात आल्यानंतर जत्रेची सांगता हाेते.

हेही वाचा