तिघांना अटक; गोव्यातील हॉटेलमधून एकाला उचलले : होणार आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश

पणजी : केरळ येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे (Digital Arrest) १.८६ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) (CBI) गोव्यासहीत (Goa) सहा राज्यांत छापे टाकले व तिघांना अटक केली. याप्रकरणी गोव्यातील एका हॉटेलमधून (Goa Hotel) ‘म्यूल अकाउंट ऑपरेटर’ला अटक केली आहे.
एवढ्या मोठ्या रकमेच्या फसवणूक प्रकणाचा तपास करण्यासाठी सीबीआने गोव्यासहीत सहा राज्यांत व्यापक शोध मोहीम राबवून तिघांना अटक केली. या कारवाईत सायबर फसवणुकीच्या जाळ्याशी संबंधित म्यूल बॅंक खाती, बनावट सीमकार्ड्स आणि शेल कंपन्यांचा मोठा गैरवापर उघडकीस आला आहे.
केरळमधील (Kerala) कोट्टायम जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने यासंदर्भात तक्रार केली होती. याप्रकरणाचा तपास करताना सीबीआयने डिजिटल फॉरेन्सिक तपास आणि आर्थिक व्यवहारांच्या मागोव्यातून शोध घेतला. त्यावेळी देशातील विविध राज्यांत व आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे जाळे पसरल्याचे दिसून आले.
सहा राज्यांत एकाच वेळी छापे
२५ फेब्रुवारी रोजी सीबीआयने एकाच वेळी गोवा, बंगळुरू (कर्नाटक), पालक्काड (केरळ), नागपूर (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगणा) आणि दिल्ली येथे छापे टाकले. या कारवाईत डिजिटल उपकरणे, डेबिट कार्ड्स, बॅंक खात्यांची कागदपत्रे आणि अन्य संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.
गोव्यातून ‘म्यूल अकाउंट ऑपरेटर’ला अटक
गोव्यातील एका हॉटेलमधून ‘म्यूल अकाउंट ऑपरेटर’ला अटक करण्यात आली. संबंधित आरोपी सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या म्यूल खात्यांचे संचालन आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार सुलभ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संशय आहे. त्याच्याकडून अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.
नागपूरमध्ये शेल कंपनी ऑपरेटर ताब्यात
नागपूरमध्ये एका शेल कंपनीमार्फत म्यूल खाती चालवणाऱ्या ऑपरेटरला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर डेबिट कार्ड्स आणि डिजिटल साधने जप्त करण्यात आली आहेत.
बंगळुरूमध्ये सिमकार्ड फसवणूक करणाऱ्याला अटक
बंगळुरूमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवून देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. हा आरोपी ‘५ जी सिम अपग्रेड’च्या आमिषाने नागरिकांची केवायसी कागदपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करत होता. ही सिमकार्ड्स परदेशातून चालवल्या जाणाऱ्या सायबर फसवणूक कारवायांसाठी वापरली जात असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्याचा होणार पर्दाफाश
या प्रकरणातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्यांमागील संपूर्ण सायबर पायाभूत रचना उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. डिजिटल प्रणालीवरील नागरिकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी संघटित सायबर गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही यंत्रणेने नमूद केले आहे.