सांत आंद्रेतील वादग्रस्त झोनबदल रद्द

आमदार वीरेश बोरकर आणि पाळे-शिरदोनवासीयांच्या लढ्याला यश; पण...

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सांत आंद्रेतील वादग्रस्त झोनबदल रद्द

पणजी: सांत आंद्रे मतदारसंघातील कलम ३९ (अ) अंतर्गत करण्यात आलेला वादग्रस्त झोनबदल अखेर रद्द करण्यात आला आहे. मुख्य नगरनियोजक वर्तिका डागुर यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आमदार वीरेश बोरकर यांची भेट घेऊन त्यांना हे पत्र सुपुर्द केले. 



दरम्यान आमदार वीरेश बोरकर यांनी त्यांना प्राप्त झालेला आदेश हा अधिकृत लेटरहेडवर नसल्याने तसेच नगरनियोजन विभागाने वापरलेल्या निलंबन (सस्पेन्शन) या शब्दाविषयी आक्षेत घेतला. तसेच हा आदेश फेटाळत त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी वादग्रस्त कलम रद्द करण्याची आणि आंदोलकांवरील एफआयआर तातडीने मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे.




नगर नियोजन (TCP) कार्यालयातील आंदोलनादरम्यान महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्याचा ठपका ठेवत पणजी पोलिसांनी बोरकर आणि पाळे-शिरदोणच्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सलग सहा दिवस उपोषण केल्याने बोरकर यांची प्रकृती चिंताजनक बनली असून त्यांना बोलणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत सरकारने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने केला आहे. घटनेच्या आठ दिवसांनंतर फाईल्स चोरीचा आरोप करणे संशयास्पद असल्याचे आरजीपीचे नेते लिसीयो रोन्कोन यांनी म्हटले आहे. या कारवाईमुळे सांत आंद्रे आणि परिसरात संतापाची लाट असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. तक्रारीची परत हाती आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारकहा खोटारडेपणा उघडा पाडू असे त्यांनी म्हटले आहे.