
मडगाव: घोगळ हाउसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या खून प्रकरणातील संशयित आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद मकानदार आणि निजामुद्दीन सय्यद यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या चारही संशयितांना अटी व शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात अक्रम खान, साहिल ऊर्फ 'स्पायकी' कन्वी, निजामुद्दीन सय्यद, हुसेन खान, सक्रुद्दीन शेख, आलम सय्यद, लतीफ सय्यद आणि उबेद मकानदार अशा एकूण आठ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, संशयित महबूबसाब अब्दुल्ला मकानदार आणि सरताज अब्दुल्ला मकानदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद मकानदार आणि निजामुद्दीन सय्यद यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करण्याच्या अटीवर मुक्त केले. याव्यतिरिक्त, मशिदीच्या परिसरात न फिरणे आणि साक्षीदारांवर दबाव न आणणे, अशा कडक अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.