ड्रग्ज तस्करीतून कमावलेली तब्बल ७.१७ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी आसगांवात ईडीची धडक कारवाई; तपास सुरू.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
ड्रग्ज तस्करीतून कमावलेली तब्बल ७.१७ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त

पणजी : गोव्यातील अमली पदार्थांच्या काळ्या बाजारातून कमावलेल्या अवैध संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पणजी विभागीय कार्यालयाने अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे ७.१७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातून ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे गोव्यातील अमली पदार्थ माफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

या प्रकरणाची पाळेमुळे मार्च २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) नोंदवलेल्या गुन्ह्यात आढळतात. उगोचुकवू सोलोमन उबाबुको, इन्फिनिटी जॉन ऊर्फ डेव्हिड आणि प्रसाद वाळके यांच्या विरोधात अमली पदार्थांच्या व्यावसायिक विक्रीचा ठपका ठेवण्यात आला होता. हणजूण आणि आसगांव परिसरातील छाप्यांमध्ये एलएसडी, कोकेन, चरस आणि गांजा यांसारखे घातक अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वाळके याच्या राहत्या घरातूनही एलएसडी जप्त करण्यात आले होते. वाळके हा या व्यवसायातील सराईत असून, यापूर्वी २०१८ मध्ये एनसीबीने तर २०२३ मध्ये गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) त्याला एमडीएमए, एक्स्टसी पावडर आणि हायड्रोपोनिक वीड यांसारख्या गुन्ह्यांत अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेला पैसा वाळके आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमध्ये रोख स्वरूपात जमा करण्यात आला. हा काळा पैसा बँकिंग व्यवस्थेत फिरवून त्यातून बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी करण्यात आली. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत आसगांव, बार्देश येथील तीन इमारतींचा समावेश आहे. यामध्ये एक तीनमजली निवासी बंगला आणि दोन दुमजली घरांचा समावेश असून, ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नातून (Proceeds of Crime) खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

केंद्राच्या 'नशामुक्त भारत अभियाना'ला बळ देण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. केवळ अमली पदार्थ जप्त करून तस्करी थांबणार नाही, तर या तस्करीचे मूळ असलेल्या आर्थिक स्रोतांवर प्रहार करणे आवश्यक असल्याचे ईडीने म्हटले आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करून ईडीने अशा गुन्हेगारांना जरब बसवणारा संदेश दिला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास अजूनही सुरू असून, या तस्करीतून लाभ मिळवणारे इतर लाभार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या सुत्रधारांचा शोध घेतला जात आहे.