श्री देव बाबरेश्वराच्या ठायी सर्व-धर्म-समभाव असल्याने सर्व जाती-धर्माचे लोक देवाचे भक्तगण आहेत. जागृत देवस्थान अशी त्याची महती आहे. नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावून जाणारा असा नावलौकिक असल्यामुळे देश-विदेशांतील भक्तगण देव दर्शनाला येतात.

हातात पेटती मशाल, खांद्यावर घोंगडी, एका हातात काठी, कमरेला धोतर व झुपकेदार मिशा असा रुबाबदार देव म्हणजे गावचा राखणदार याला "देवचार" असे संबोधले जाते. गावच्या सीमेवर राखणदाराचे स्थान असते. विशेषतः त्याचे वस्तीस्थान एखाद्या डेरेदार वृक्षावर असते. त्याचप्रमाणे त्यांची देहयष्टीसुद्धा वृक्षाप्रमाणे विशाल असते. भूत-प्रेत, ब्रह्म-संबंध यांच्यापासून रक्षण करण्याचे काम देवाने देवचारावर सोपवले आहे. गावाबाहेरील वाईट शक्तींना गावच्या वेशीत प्रवेश करू न देता त्या दुष्ट शक्तींना अडवून ठेवून गावच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत असतानाच अडल्यानडल्या व्यक्तींना दृश्य व अदृश्यपणे मदत करण्याचे काम ही शक्ती करत असते. रात्री अपरात्री वाट चुकलेल्यांना वाट दाखविण्याचे कामही करत असल्यामुळे याला ‘वाटारा’ असेही म्हटले जाते.
फोंडा कटंगळीचा कटमगाळ दादा, केरी सत्तरीचा आजोबा, म्हापसा बोडगिणीचा बोडगेश्वर त्याचप्रमाणे कळंगुट खोब्रेवाड्यावरील देव बाबरेश्वर. बाबरेश्वराचे आदीस्थान बागा कळंगुट येथे उंच पर्वत शिखरावर होते. तेथे जंगल व दाट झाडी असल्याने व येण्या-जाण्यास सोयीस्कर अशी वाट नसल्याने त्रासदायक होत असे. तेव्हा भक्तगणांनी श्री बाबरेश्वराची प्रार्थना केली. तू आम्हाला येण्या-जाण्यास सोयीस्कर होईल अशा ठिकाणी वस्तीला ये, जेणेकरून आम्हाला तुझी नित्यनेमाने पूजा अर्चा करून तुझी भेट घेता येईल. भक्ताच्या मनाची तळमळ पाहून देव खोब्रावाडा कळंगुट येथे एका करवंदीच्या झाडावर वस्तीला आले. त्यावेळी कळंगुटमधील बहुतेक लोकांचा मासेमारीचा व्यवसाय होता. बहुतेक कोळी लोक मासे पकडण्यासाठी सासष्टीत येथे जात असत. एक दिवस ते जाळे घेऊन समुद्रावर गेले असता एकही मासा त्यांच्या जाळ्याला लागला नाही. त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. मासे विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. आता आपल्या मुलाबाळांच्या पोटापाण्याची व्यवस्था कशी होईल या विवंचनेने ते अगदी निराश झाले. त्यातील एका ज्येष्ठ रापणकाराने देव बाबरेश्वर याची महती वडिलधाऱ्या माणसांकडून ऐकली होती. त्याने प्रयत्न करून पाहावे म्हणून देव बाबरेश्वर याला हात जोडले व प्रार्थना करून देवाला साकडे घातले. ‘देवा आम्ही हे जाळे घेऊन इकडे तिकडे धावत आहोत. आम्हाला कुठेच मासे मिळत नाहीत. आता आम्ही तुझ्या परिसरात रापण टाकतो आम्हाला यश दे आणि आमच्या पोराबाळांचा चरितार्थ चालव. आम्ही तुझ्या चरणापाशी भजन करू,’ अशी प्रार्थना करून त्यांनी देव बाबरेश्वर असलेल्या किनाऱ्यावर रापण टाकली आणि काय आश्चर्य, त्या दिवशी त्यांच्या जाळ्यात एवढे मासे पडले की त्याचा उपसा करून संपेना. त्या दिवसापासून तेथील सारे रापणकार बांधव देवाचे भक्त बनले. त्यांनी तेथे भजन-पूजन चालू केले.
प्राचीन काळापासून इथे देवाची वस्ती आहे, पण हा भाग झाडा-झुडपांनी वेढला गेल्यामुळे तेथे माणसे पोहोचत नव्हती. त्यामुळे देवस्थान प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. पण आज भारतातच नव्हे, तर साऱ्या जगामध्ये श्री बाबरेश्वर देवस्थान व केळीच्या घडांची जत्रा प्रसिद्ध आहे.
श्री देव बाबरेश्वराच्या ठायी सर्व-धर्म-समभाव असल्याने सर्व जाती-धर्माचे लोक देवाचे भक्तगण आहेत. श्री देव बाबरेश्वर हे जागृत देवस्थान अशी त्याची महती आहे. नवसाला पावणारा व भक्ताच्या हाकेला धावून जाणारा असा नावलौकिक असल्यामुळे देश-विदेशांतील भक्तगण देव दर्शनाला येतात. गावा-गावांमधून होणाऱ्या जत्रांचे वैशिष्ट्य असते. श्री देवी लईराई आईचे होमखंड, मदनंताचा सख्याहरी, मळकर्णेचा शेणी उत्सव त्याचप्रमाणे श्री बाबरेश्वर याची केळ्यांची जत्रा.
कळंगुट खोब्रावाड्याच्या किनारी भागात भाविकांच्या पसंतीस उतरलेली तसेच दाक्षिणात्य साज चढवलेली, डोळ्यांचे पारणे फेडणारी सुंदर सुबक वास्तू पहावयास मिळते. तिथे श्रावण महिन्यात उत्सव असतो. माघ कृ. पंचमीच्या दिवशी घडाची जत्रा भरते. सतत सात दिवस चालणाऱ्या या जत्रेच्या निमित्ताने सारा परिसर सुशोभित व माणसांनी फुलून गेलेला असतो. इच्छित साध्य झाल्यावर नवस फेडण्यासाठी केळ्यांचे घड घेऊन येणारे लोक येथे गर्दी करतात. पाच केळ्यांचा फेणा ठेवून सुरू झालेला जत्रोत्सव आज पाच ते सहा हजार केळ्यांच्या घडांनी संपन्न होतो. हे घड माटोळी स्वरूपात बांधले जातात.
जत्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरात पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रम व लघुरुद्र असते. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक सत्यनारायण पूजा व त्यानंतर सातही दिवस स्थानिक लोक सत्यनारायण पूजा करताना दररोज महाप्रसादाचा नैवेद्य असतो. कळंगुट हा समुद्र किनारा असल्याने पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते. केळ्यांच्या उत्सवाला काही पर्यटक आवर्जून हजर रहातात. ‘बनाना फेस्टिवल’ म्हणून त्यांना या जत्रेचे आकर्षण आहे. अशा प्रकारची
जत्रा गोव्यातच नव्हे, तर देशभरात कुठेही होत नसल्याचे सांगण्यात येते.