मॅक्सिकोचा मोस्ट वॉन्टेड ड्रग लॉर्ड 'एल मेंचो' खलास; प्रेयसीने केला घात!

दशकातील सर्वात मोठी कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
मॅक्सिकोचा मोस्ट वॉन्टेड ड्रग लॉर्ड 'एल मेंचो' खलास; प्रेयसीने केला घात!

मॅक्सिको : सुरक्षा यंत्रणांनी प्रेयसीच्या हालचालींवर नजर ठेवून पाठलाग करीत मॅक्सिकोमधील (Mexico) एक अत्यंत कुख्यात ड्रग लॉर्ड (most wanted drug lord) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेमेस‌ियो ओसेग्वेरा उर्फ ‘एल मेंचो’ (‘El Mencho’) याचा खात्मा केला.

त्याचा ठावठिकाणा त्याच्या प्रेयसीच्या हालचालींवरून लागल्यानंतर मॅक्सिकोच्या सुरक्षा दलांनी मोठ्या कारवाईत त्याला ठार केले.मॅक्सिकोतील ड्रग कार्टेलविरोधातील लढ्यातील ही गेल्या दशकातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘एल मेंचो’ हा ‘जल‌िस्को न्यू जनरेशन कार्टेल’ (सीजेएनजी) (CJNG) या कुख्यात ड्रग संघटनेचा प्रमुख होता. अनेक वर्षे तो मॅक्सिको व अमेरिकच्या यंत्रणांच्या रडारवर असूनही; अटकेपासून बचाव करत होता. मात्र, यावेळी त्याच्या निकटवर्तीय प्रेयसीमुळेच सुरक्षा यंत्रणांना त्याच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सापडला. 

प्रेयसी मुळेच झाला घात 

मॅक्सिकोचे संरक्षण सचिव जनरल र‌िकार्डो ट्रेविला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी तपास पथकाने ‘एल मेंचो’च्या प्रेयसीशी संबंधित एका विश्वासू सहकाऱ्यावर लक्ष केंद्रीत केले. शुक्रवारी रात्री हा सहकारी संबंधित महिलेला तपालपा (जालिस्को प्रांत) येथे घेऊन गेला. ‌जिथे तिची ‘एल मेंचो’शी भेट झाली. 

सुरक्षा यंत्रणांनी या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली होती. शनिवारी सकाळी संबंधित महिला त्या ठिकाणाहून निघताच सुरक्षा दलांनी तातडीने कारवाईचा निर्णय घेतला. 

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून माहिती 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून (US intelligence) मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीद्वारे ‘एल मेंचो’चे अचूक ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर मेक्सिकोच्या लष्कर व नॅशनल गार्डने जमिनीवर घेरा घातला. सहा हेलिकॉप्टर, विशेष पथके आणि हवाई टेहळणीसाठी मॅक्सिकोच्या हवाई दलाची मदत घेण्यात आली, जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही.

पहाटे चकमक आणि शेवट

रविवारी पहाटे खात्री झाल्यानंतर दलांनी अंतिम कारवाई सुरू केली. चकमकीदरम्यान ‘एल मेंचो’ने दोन अंगरक्षकांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर इतर सशस्त्र गुंडांनी लष्कराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक कारवाईत तो ठार झाला. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, या कारवाईमुळे सीजेएनजी (CJNG) संघटनेला मोठा फटका बसणार असून, पुढील काही दिवसांत संघटनेतील सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा