४ कोटी रुपये रोख; राज्यातील इतिहासातील सर्वात मोठी रोकड जप्त

भुवनेश्वर : ओडिशा (Odisha) राज्यातील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेने इतिहासातील सर्वात मोठी रोकड जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ओडिशा राज्य दक्षता (Odisha State Vigilance) विभागाने खाण खात्याचे अधिकारी (Mines Department officer) देबब्रत मोहंती (Debabrata Mohanty) यांना अटक करून त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला असता; तब्बल ४ कोटी रुपये एवढी रोकड सापडली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरमधील त्याच्या फ्लॅटमध्ये ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवलेल्या नोटांची बंडले आढळली. ही राज्यातील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेने केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती असल्याचे सांगण्यात आले.
मोहंती यांना मंगळवारी (२४ फेब्रुवारी २०२६) रात्री एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. संबंधित विक्रेत्याच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत; यासाठी ही लाच स्वीकारली जात होती.
अटकेनंतर दक्षता विभागाने भुवनेश्वर येथील फ्लॅट, भद्रक जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी असलेले घर तसेच कटक येथील कार्यालय अशा ठिकाणी एकाच वेळी झडती मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान त्याच्या कार्यालयातील ड्रॉवरमधून १.२० लाख रुपयांची अतिरिक्त रोकडही जप्त करण्यात आली.
याशिवाय भुवनेश्वरमध्ये आलिशान दुमजली घर आणि सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने अशी मालमत्ता आढळून आली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी एप्रिल ७, २०२२ रोजी गंजाम जिल्ह्यातील लघु सिंचन विभागातील सहाय्यक अभियंत्याच्या निवासस्थानी ३.४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. मात्र, सद्य कारवाईत जप्त झालेली ४ कोटी रुपयांची रक्कम ही आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.