युरी म्हणाले- त्या पोलिसाचे थेट निलंबनच करा; बदलीची कारवाई पुरेशी नाही

पणजी: मतदारसंघाच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधीला पोलिसांनी असे ओढून बाहेर काढणे, ही अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला घातक बाब आहे. अशा कृत्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची केवळ बदली करून चालणार नाही, तर त्यांचे तात्काळ निलंबन झाले पाहिजे, अशी आक्रमक मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते युरी आलेमाव यांनी केली आहे. आमदार वीरेश बोरकर यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध करत युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) बैठकीत सरकारला धारेवर धरले.
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने या गैरवर्तणुकीला तेच जबाबदार असल्याचे सांगत, युरी आलेमाव यांनी सभापतींनी आमदारांचे संरक्षक म्हणून कडक भूमिका घ्यावी, अशी विनंती केली. दरम्यान, सभापती गणेश गावकर यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, त्यांनी स्वतः आझाद मैदानावर जाऊन वीरेश बोरकर यांची भेट घेतली आहे. प्रश्नांची सोडवणूक उपोषणापेक्षा चर्चेतून अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा सल्ला त्यांनी बोरकर यांना दिला. सभापती या नात्याने आपल्या अधिकारात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.