बीएसीच्या बैठकीत '३९ (अ)' कलमाचा विषय, खाजगी ठराव व पोलिसांची गैरवर्तणूक यावर मांडली आक्रमक भूमिका

पणजी: नगरनियोजन कायद्याच्या कलम '३९ (अ)' विरोधात आझाद मैदानावर उपोषणास बसलेले सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. तरीही, बोरकर यांनी अत्यंत अशक्त अवस्थेत व्हीलचेअरवरून विधानसभा संकुलात जाऊन 'कामकाज सल्लागार समितीच्या' (BAC) बैठकीत हजेरी लावली.
या बैठकीत बोरकर यांनी '३९ (अ)' कलमाचा विषय, खाजगी ठराव आणि सरकारी कार्यालयात पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की यावर आक्रमक भूमिका मांडली. अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यानंतर सभापती आमचे रक्षणकर्ते असतात, मग आमदाराला धक्काबुक्की कशी होऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरनियोजन खात्याकडून प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन, नगरनियोजन सचिवांकडून तातडीने माहिती पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. सभापतींनीही यापुढे अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही दिली. मात्र, ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने बोरकर यांनी बैठकीनंतर पुन्हा आझाद मैदानावर जाऊन आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.