
पणजी: कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्लायवूडवाहू ट्रकचा चोर्ला घाटात भीषण अपघात झाला. वाइल्डरनेस्ट हॉटेलजवळील एका धोकादायक वळणावर ताबा सुटल्याने हा ट्रक थेट दरीत कोसळला. या दुर्दैवी घटनेत ट्रकखाली चिरडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेल्या ट्रकखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला क्रेनची मदत घ्यावी लागली. जखमी व्यक्तीला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी वाळपई आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार, हा स्वयंअपघात असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोर्ला घाटातील वळणांवर चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.