५ ते ८ मार्च दरम्यान आयोजन : चित्ररथ स्पर्धेसह नाट्यप्रयोग, संगीत रजनी

म्हापसा : म्हापसा शिगमोत्सव मंडळ आयोजित ४७ वा शिगमोत्सव येत्या ५ ते ८ मार्च रोजी साजरा होणार आहे. दि. ८ मार्च रोजी चित्ररथ, रोमटामेळ व लोकनृत्य मिरवणूक होईल. हा शिगमोत्सव पर्यटन खाते, म्हापसा नगरपालिका आणि स्वराज्य गोमंतक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला असून पर्यटन खात्यातर्फे यंदा १६ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य या उत्सवासाठी दिले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर यांनी दिली.
म्हापसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नाटेकर यांच्याससह सचिव साईनाथ राऊळ, खजिनदार यशवंत गवंडळकर, सहसचिव मिलिंद महाले, योगेश खेडेकर, साईश सावंत, उमेय नाटेकर, पंकज जल्मी यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष म्हणून उपसभापती जोशुआ डिसोझा व उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्यासमवेत सर्व नगरसेवक व नगरसेविकांची निवड केली आहे. साईनाथ राऊळ (सचिव), सुशांत हरमलकर (सहसचिव) आणि चंद्रशेखर बेनकर व विकास आरोलकर (उपखजिनदार) या नगरसेवकांची कार्यकारी मंडळावर निवड झाली आहे. तसेच सल्लागार समिती, प्रसिद्धी समिती व सदस्यांची यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. नाटेकर यांनी दिली.
सचिव साईनाथ राऊळ यांनी सांगितले की, यंदा १०.५७ लाखांच्या बक्षिसांची खैरात असेल. गुरुवार दि. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता टॅक्सी स्टँडवर वार्षिक रंगोत्सव साजरा होईल. यावेळी ब गटातील (लहान मुले) वेशभूषा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. शुक्रवार दि. ६ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वराज गोमंतक प्रस्तुत ‘आकाशमिठी’ हा एतिहासिक नाट्यप्रयोग होईल. शनिवार दि. ७ रोजी सायंकाळी ७ वा. विश्वजीत बोरवणकर यांची संगीत रजनी कार्यक्रम होईल.
स्पर्धक उशिरा आल्यास ठरणार बाद!
रविवारी ८ रोजी सायंकाळी ३.३० वाजता आंगड येथील श्री राष्ट्रोळी देवाला नमन करून चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व अ गट वेशभूषा स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेतील प्रवेशिका रमेश वाईन स्टोअर, जी. बी. टेक्सटाईल व मोहन काणेकर या दुकानावर दि. २५ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत उपलब्ध असतील. आलेल्या प्रवेशिकांनुसार ६ मार्च रोजी ऑनलाईन ड्रॉ होईल व या निकालाप्रमाणे स्पर्धकांना मिरवणुकीत सहभागी व्हावे लागेल. स्पर्धक उशिरा आल्यास बाद ठरवले जाईल.