केतन भाटीकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस अधिक बळकट !

युरी आलेमाव : येत्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित


19 mins ago
केतन भाटीकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस अधिक बळकट !

डॉ. केतन भाटीकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, युरी आलेमाव व इतर.
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : फोंडा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ते काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. त्यासाठी राजेश वेरेकर यांच्यासह केतन भाटीकर विजयाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.
फोंडा येथे मंगळवारी झालेल्या केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेश कार्यक्रमात आलेमाव बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, केतन भाटीकर, राजेश वेरेकर, फोंडा काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष विलियम आगियार व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, गोव्यातील भाजप सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष बूथ पातळीवर काम करणार आहे. त्याच्याबरोबर काँग्रेस संघटना बळकट करून सत्ता मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील.
भाजपला धडा शिकवण्याची गरज : पाटकर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, फोंडा मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री वारंवार येऊन जनतेला आश्वासने देत आहेत. गेल्या चार वर्षांत सरकारने या मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून येणाऱ्या पोटनिवडणुकीत जनतेने सज्ज राहून भाजपला धडा शिकविण्याची गरज आहे.
प्रत्येकाच्या घरी पोहोचणार : भाटीकर
केतन भाटीकर यांनी सांगितले, राजेश वेरेकर आणि आपले लहानपणापासून मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे पक्षात संघटितपणे काम करण्यात अडचण येणार नाही. कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पुढील काही दिवसांत प्रत्येकाच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भाटीकर आता राजकीय मित्र : वेरेकर
केतन भाटीकर हे पूर्वी इतर पक्षात काम करीत होते. आता केतन भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपले राजकीय मित्र बनले अाहेत, असे राजेश वेरेकर यांनी सांगितले.