कलम ‘३९ ए’ रद्द करण्यासाठी आज पणजीत महाआंदोलन

विरोधकांची वज्रमूठ : आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय


10 mins ago
कलम ‘३९ ए’ रद्द करण्यासाठी आज पणजीत महाआंदोलन

आझाद मैदानात आंदोलन करताना आमदार वीरेश बोरकर, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, मनोज परब व इतर. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : जमिनीचे रूपांतरण करणारे कलम ‘३९ ए’ रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सोमवारी महाआंदोलन करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी जाहीर केला. राज्यभरातून पाच हजारांहून अधिक लोक आंदोलनात सहभागी होतील, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. पाळे-शिरदोन प्रश्नावरून सुुरू असलेल्या या आंदोलनात विरोधी पक्षांची एकजूट दिसून आली.
कलम ३९ ए नुसार पाळे-शिरदोन येथे केलेले जमीन रूपांतरण मागे घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन हाती घेतले आहे. आता रूपांतरणाचे कलम ‘३९ ए’ रद्द करण्याची मागणी रविवारी सकाळी झालेल्या बैठकीत करण्यात आली. पाठिंबा वाढल्याने आंदोलकांनी आपली मागणी गावापुरती मर्यादित न ठेवता तिला राज्यस्तरीय स्वरूप दिले आहे. काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आरजीपीचे प्रमुख मनोज परब, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर नेत्यांनी प्रत्यक्ष येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार वीरेश बोरकर यांनी केला.
गोवा वाचवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची युती होणे आवश्यक आहे. पक्षाने युतीसाठी तयारी दाखवली नाही तर आम्ही वरिष्ठ नेत्यांना युतीची गरज पटवून देऊ, असे आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले. वेळ पडली तर सत्तरीतून ४५ हजार लोक आम्ही पणजीत आणू शकतो, असे वक्तव्य नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रत्युत्तर दिले. ४५ हजार लोक म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ३ टक्के होतात. उर्वरित ९७ टक्के जनतेला तोंड देण्याची तयारी मंत्री राणे यांनी ठेवावी, असे पाटकर म्हणाले.
मागण्या मान्य न केल्यास ‘जेल भरो’ : युरी
कलम ‘३९ ए’ रद्द करण्यासह आमदार बोरकर यांना कार्यालयातून फरफटत बाहेर काढणाऱ्या पोलिसांना निलंबित केले पाहिजे. आमची मागणी मंजूर झाली नाही तर ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी दिला.
कलम ‘३९ ए’चा निर्णय न्यायालयात : विजय सरदेसाई
कलम ‘३९ ए’चा विषय न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर आता न्यायालयातच निर्णय होईल. प्रादेशिक आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
आमदार वीरेश बोरकर भावूक
आझाद मैदानावर मी लहान असताना स्वातंत्र्यसैनिक असलेल्या माझ्या आजोबांसोबत येत होतो. आझाद मैदान हे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीचे प्रतीक आहे. याच मैदानावर आता आम्हाला गोवा वाचवण्यासाठी लढावे लागत आहे, असे सांगताना आमदार वीरेश बोरकर भावूक झाले. यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आेघळले.
कलम रद्द होईपर्यंत आंदोलन कायम : मनोज परब
नगरनियोजन कार्यालयातून आमदार वीरेश बोरकर यांना बाहेर काढणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केली. कलम ‘३९ ए’ रद्द होईपर्यंत आंदोलन कायम राहील, असा इशाराही परब यांनी दिला.