मिराबाग-सावर्डेतील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात भव्य मशाल मिरवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
मिराबाग-सावर्डेतील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात भव्य मशाल मिरवणूक

सांगे : मिराबाग-सावर्डेतील प्रस्तावित बंधारा कोणत्याच स्थितीत होऊ देणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. आंदोलनाच्या १३ व्या दिवशी रविवारी बंधाऱ्याविरोधात भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.

कुडचडे येथील राखणदार पुरुषम्हारू देवाला गाऱ्हाणे घालून, तिथून रेल्वे मार्गे, कुडचडे बाझार, शिवाजी सर्कलहून थेट मिराबाग येथे सांगता झाली. या मशाल मिरवणुकीत हजारो संख्येने लोक उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, मिराबाग येथे येणारा प्रकल्प तीन मतदारसंघांसाठी घातक आहे. लोकांना नको असताना सुद्धा सरकार लोकांच्या माथ्यावर हा प्रकल्प मारण्याचा प्रयत्न करत आहे. आज गोवाभर लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत.

संकेत भंडारी म्हणाले की, सरकारच्या डोळ्यावर आलेला काळोख दूर कण्यासाठी, त्यांची जागा दाखण्यासाठी रस्त्यावर लोक उतरले आहेत. आज क्रांती घडताना दिसत आहे. १८ जूनला क्रांती घडवून गोवा स्वतंत्र केला होता. तीच क्रांती आज परत एकदा गोव्यात घडणार आहे.

रामा काणकोणकर म्हणाले, समाजाचे नाव वापरून राजकारण केले जात आहे. पण ही जनता तुम्हाला गप्प बसणार नाही. लोक गाव राखण्यासाठी रस्त्यावर आलेले आहेत. राष्ट्र हिंदू व्हायला पाहिजे, असे भाजप म्हणते. परंतु हिंदू राष्ट्रात खाप्रेश्वर नाही? राखणदार नाही,? हिंदू नाही? तर मग बंधारा आणून हिंदूंवर का अन्याय होतो? तीन मतदारसंघाची वाट लावणारा बंधारा नकोच असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शंकर पोळजी, तनोज अडवलपालकर, मॅश्यु डिकॉस्टा, फिडोल फर्नांडिस व इतरांनी विचार मांडले.