कॅसिनोतील सुरक्षा रक्षकाच्या खूनप्रकरणी आरोप निश्चितीचे आदेश

कांपाल येथील कॅसिनो कार्निव्हलमधील २०२५ मधील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
कॅसिनोतील सुरक्षा रक्षकाच्या खूनप्रकरणी आरोप निश्चितीचे आदेश

पणजी : कांपाल येथील कॅसिनो कार्निव्हलमध्ये २०२५ मध्ये धीरू शर्मा (मध्य प्रदेश) या सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबाबांवरून संशयिताने खून केल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे पुरेसे पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित अब्दुल अल्ताफ (हैदराबाद) याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.

याबाबतचा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट्स यांनी दिला. कॅसिनो कार्निव्हलमध्ये २९ मे २०२५ रोजी पहाटे संशयित अब्दुल अल्ताफ हा कॅसिनोत पैसे हरला होता. त्यामुळे त्याने तिथे राडा केला. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संशयिताने लाकडी काठीच्या साहाय्याने सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. काठीच्या टोकाला असलेल्या लोखंडी क्लॅम्पमुळे सुरक्षा रक्षकांना गंभीर दुखापत झाली. त्यात धीरू शर्मा या सुरक्षारक्षकास गंभीर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. तर, या हल्ल्यात दुसरा सुरक्षा रक्षक सत्यम सुभाष गावकर (शिरोडा-गोवा) याच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. या प्रकरणी पणजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी संशयित अब्दुल अल्ताफ याने घटनास्थळीवरून पळ काढला होता.

पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दाबोळी विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात प्राथमिक सुनावणी झाली. त्यात संशयिताविरोधात प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबाबांची न्यायालयाने नोंद घेतली. संशयिताने खून केल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे पुरेसे पुरावे समोर आले. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून अब्दुल अल्ताफ याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.