मुंबईत नायजेरियन महिलेला डिपोर्ट करून आल्यानंतर गाठले मृत्यूने

पणजी : म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) सारिका नाईक (गिरी म्हापसा) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात कार्यरत असलेली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सारिका नाईक व इतर दोन सहकारी दि. २१ रोजी सकाळी मुंबईत एका नायजेरियन महिलेला डिपोर्ट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर हे तिघेही पोलीस कर्मचारी रात्री रेल्वेतून गोव्यात परतले. रात्री १०.३० वा. सुमारास त्या थिवी रेल्वे स्टेशनवर उतरल्या. टॅक्सीने त्या स्थानबद्धता केंद्रात जाताना वाटेतच स्टेशन जवळील बसस्टॉपवर सारिका नाईक यांना अचानक चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. यानंतर म्हापसा येथे शाही इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.