कर्नाटकमधून गोव्यात बेकायदेशीर वाहतूक : दोघांना अटक

जोयडा : कर्नाटक राज्यातील दावनगेरी येथून गोव्यातील कुंडई परिसरात मिथेनॉल/नॉन-पोटेबलच्या नावाखाली शुद्ध मद्यसाराची (स्पिरिट) बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन टँकरांवर अनमोड अबकारी नाक्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ६० हजार लिटर मद्यसार जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे.
अबकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली व कारवार जिल्ह्याच्या अबकारी उपआयुक्तांच्या आदेशानुसार अनमोड येथे नियमित वाहन तपासणी सुरू होती. खात्रीशीर माहितीच्या आधारे रात्री दोनच्या सुमारास दोन टँकर गोव्याकडे जाताना आढळले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने सुरुवातीला वाहन न थांबवता पुढे नेले. त्यानंतर पाठलाग करून दोन्ही टँकर ताब्यात घेण्यात आले.
तपासात एमपी ०९ एचएच १९०८ व केए ४८ ए २२१८ क्रमांकाचे टँकर असल्याचे निष्पन्न झाले. चालकाकडून टॅक्स इनव्हॉइस, दोन ई-वे बिल, ट्रान्सपोर्ट डिक्लेरेशन तसेच संबंधित कंपन्यांची पत्रे सादर करण्यात आली. मात्र, कागदपत्रांची पडताळणी व प्राथमिक रासायनिक तपासणीत सदर द्रवामध्ये सुमारे ९५.७ टक्के अल्कोहोल प्रमाण आढळले. त्यामुळे हा ‘सेवनास अयोग्य’ नसून प्रत्यक्षात सेवनास योग्य असलेला शुद्ध मद्यसार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच आवश्यक रहदारी परवाना नसताना हा माल वाहतूक केला जात असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान चालकाने सदर बाब मान्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच कारवार, यल्लापूर व दांडेली येथील अबकारी पथके घटनास्थळी दाखल झाली. संबंधितांवर अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामागील संभाव्य आंतरराज्य जाळ्याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
मध्यप्रदेशातील दोघांना अटक
या प्रकरणी मग्गर सिंग (वय ५५, रा. इंदूर, मध्यप्रदेश) व संशयसिंग बुल्लर (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही टँकर व ६० हजार पेक्षा अधिक लिटर मद्यसार जप्त करण्यात आला असून नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.