मृताच्या अंगावरील दागिने चोरी प्रकरण : अटक बेकायदा असल्याचे निरीक्षण

म्हापसा : हणजूण पोलिसांनी स्वयंअपघातातील मृत जस्टर रॉड्रिग्ज (२७, रा. केपे) याच्या अंगावरील ७ ते ८ लाखांचे सुवर्णलंकार चोरी केल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी पोलीस रॉबर्ट जीप चालक कॉन्स्टेबल साईश पार्सेकर याला अटक केली होती. ही अटक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता केल्याने त्याला तत्काळ सोडण्याचे आदेश म्हापसा न्यायालयाने दिले.
शनिवार, दि. २१ रोजी पोलिसांनी संशयिताला पोलीस कोठडीसाठी प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले. त्याचवेळी संशयिताच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आरोपी तपासात सहकार्य करत नाही, त्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी, हे चौकशी अधिकार्यांचे विधान व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्येक आरोपीला गप्प राहण्याचा अधिकार आहे. कोणत्याही आरोपीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. पोलीस अधिकार्यांसमोर आरोपीने केलेला कबुलीजबाब पुराव्यामध्ये ग्राह्य धरला जात नाही आणि तो रेकॉर्डचा भागही बनू शकत नाही. त्यामुळे तपास असहकार्याचे वक्तव्य वैध मानले जाऊ शकत नाही. तसेच आपल्या अशिलाची अटक ही बेकायदेशीर असून बीएनएसएच्या कलम ३५(५) चे उल्लंघन करते. जर अशा कृतीला न्यायालयाने परवानगी दिल्यास बीएनएसएस कलम ३५(३) व ३५(५) चा उद्देशच नष्ट होईल, असा युक्तीवाद संशयिताच्या वकिलांनी केला.
दरम्यान, जस्टरचा अपघात २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३.१५ वा.च्या सुमारास हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ झाला होता. माडाला धडक दिल्याने जखमी होऊन जस्टरचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी जस्टर याच्या अंगावरील सोन्याचे ब्रासलेट, कडा आणि एक अंगठी या ७ ते ८ लाखांचे सुवर्णलंकार गहाळ झाले होते. या वस्तू साईश पार्सेकर याने चोरल्याची आरोप करत जस्टरचा भाऊ जोवी रॉड्रिग्ज याने पोलिसांत तक्रार दिली होती. हणजूण पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करत २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार्सेकर याला अटक केली होती.
पोलीस कोठडीची विनंती फेटाळली
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावली. तसेच आरोपीला तत्काळ सोडण्याचा आदेश दिला. शिवाय आरोपीने पोलिसांच्या नोटीसीचे पालन करत तपास अधिकार्यांकडे चौकशीला हजर राहावे, जर पोलिसांना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पुन्हा अटक करायची असल्यास त्यांना ते स्वातंत्र्य असल्याचे या निवाड्यात न्यायाधीशांनी नमूद केले.