अॅड. कार्लुस फेरेरा : उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

म्हापसा : थिवी येथील कान्सा टेकडीवरील कोमुनिदच्या जागेत होऊ घातलेल्या एमआयटी या खासगी विद्यापीठाच्या विरोधातील स्थानिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या निवाड्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आगामी दहा दिवसांत आव्हान देणार आहोत, अशी माहिती हळदोणाचे आमदार तथा थिवीतील याचिकादार नागरिकांचे कायदा प्रतिनिधी अॅड. कार्लुस फेरेरा यांनी दिली.
शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी खोर्जुवे येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अॅड. फेरेरा बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत एमआयटी विद्यापीठ विरोधी जनचळवळीतील कार्यकर्ते रॉबर्ट कुलासो आणि मॉली सिल्वा उपस्थित होत्या.
गुरुवार, दि. १९ रोजी नियोजित विद्यापीठाच्या जागेत सुरू असलेल्या डोंगर कापणीला आक्षेप घेत रहिवाशांनी प्रकल्पस्थळी निदर्शने केली होती. या आंदोलनाचे समर्थन करत अॅड. फेरेरा यांनी आंदोलन करणाऱ्या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला.
आमदार अॅड. फेरेरा म्हणाले की, हे प्रकरण वकील म्हणून हाताळताना मी एक रुपयाही शुल्क आकारले नाही. अशाप्रकारे सरसकट कोमुनिदाद जागा बाहेरील शैक्षणिक संस्थांना देणे उचित नाही. शिवाय गोव्यातील कोमुनिदाद जागा आम्हाला क्रोनी कॅपिटलिझम पासून वाचवायची आहे, असे ते म्हणाले.
एखाद्या प्रकल्पाचा सर्व बाजूने भौगोलिक आणि लोकशास्त्रीय दृष्टीकोनाने अभ्यास करणे आवश्यक असते. हल्ली सरकार लोकांना प्रकल्प राबवताना विश्वासात घेत नाही. सरकारने आधी लोकांची मानसिक स्थिती पाहून त्याचा आदर ठेवला पाहिजे. सरसकट सर्वांना समाधान करता येणे शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु किमान लोकांचे समाधान करता येते, यासाठी ग्रामस्थांसोबत योग्य संवाद साधावा, प्रश्नांना समाधानकारक उत्तर द्यायला हवे. लोकांना अंधारात ठेवून मागील दाराने प्रकल्प राबविणे चुकीचे आहे, असे अॅड. फेरेरा यांनी सांगितले.
हेतू पत्राला आमचा आक्षेप : फेरेरा
सरकारने या प्रस्तावित खासगी विद्यापिठाला दिलेल्या हेतू पत्राला आमचा आक्षेप आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु निर्णय आमच्या बाजूने लागला नाही. संबंधित निवाड्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.