कृषी खात्याच्या अधिकाऱ्याची माहिती : सध्या कोणताही धोका नाही

पणजी : सध्या आंब्याचा हंगाम उत्तमरीत्या सुरू आहे. पिकाला सध्या तरी कोणताही फटका बसलेला नाही. दर्जेदार पीक तयार होऊन एप्रिलपर्यंत आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येईल, अशी माहिती कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सध्या गोव्याच्या विविध भागांत आंबे तयार होण्यास सुरुवात झाली असून, काही ठिकाणी अजूनही आंब्याचा मोहोर शिल्लक आहे. सध्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात तयार होऊन बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय, मानकुराद आंबादेखील तयार होऊन काही प्रमाणात बाजारात दिसू लागला आहे. मात्र, त्याचे दर ६ हजार रुपये प्रति डझन, म्हणजेच ५०० रुपये प्रति नग इतक्या चढ्या दराने विकले जात होते.
आंब्याचे चांगले पीक मिळेल : कृषी खाते
कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आंब्याचा हंगाम खूप चांगला चालला असून भविष्यात चांगले पीक मिळण्याची आशा आहे. आम्ही सध्या आंब्याच्या बागायती लिलावात काढल्या आहेत आणि ज्यांनी त्या घेतल्या आहेत, त्यांनी यंदा पीक चांगले येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. जितक्या बागायती आम्ही लिलावात दिल्या, त्यातून आम्हाला चांगला दर मिळाला आहे. पिकाला अद्याप कोणताही फटका बसलेला नसल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कृषी खात्याच्या एकूण सहा बागायती असून त्यांचे विश्लेषण सुरू आहे. यामध्ये कुळे, केरी, म्हापसा, पेडणे, वाळपई आणि मडगाव या भागांचा समावेश आहे. सध्या कुळे येथील बागायतीला नुकताच मोहोर फुटल्यामुळे, ती सोडून इतर सर्व बागायतींचा लिलाव करून त्या करारावर देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
....................
एप्रिलपासून आंब्याची होणार मोठी आवक
आंबे आता मोठ्या प्रमाणात लागण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ते मोठे होत आहेत तर काही ठिकाणी तयार झाले आहेत. व्यावसायिकदृष्ट्या एप्रिलपासून आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास सुरुवात होईल. सध्या बाजारात अल्प प्रमाणात आंबे येत असले तरी एप्रिलपासून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
......