
पणजी : गोव्यात (Goa) २०२५ मध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागातील रस्त्यांवर तिप्पट प्राणघातक अपघात झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) २०२५ च्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षात झालेल्या रस्ते अपघातात (Accident) गोव्यातील ग्रामीण भागात २१५ जण मृत्यू पावले तर शहरात (City) ५८ जणांनी जीव गमावला.
२०२५ मध्ये गोव्यात एकूण २,३७० अपघात घडले. त्यातील २६२ जीवघेणे ठरले तर त्यात २७३ जण ठार झाले. त्यातील जास्त अपघात हे निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवल्याने झाले. मुख्य म्हणजे त्यातील बरेच अपघात दुपारी १ ते संध्याकाळी ४ या दरम्यान घडले. त्यातील ९८ जीवघेणे अपघात निवासी भागात झाले.
एका वरीष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २०२४ पेक्षा २०२५ मध्ये एकूण जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले व मृत्यू पावलेल्यांची संख्याही कमी आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर आवश्यक अभियांत्रिकी खबरदारी घेण्यासंदर्भात वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक विभागाने अपघात कमी करण्यासाठी मोहीम सुरू केली असून, त्यात जागृती करण्याबरोबरच निष्काळजीपणे व नियमभंग करून वाहने हाकत असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
नियमांचे पालन करावे
वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने हाकावीत. दुचाकी स्वार व मागे बसत असलेल्यांनी हेल्मेट परिधान करणे, चारचाकी वाहनांचे चालक व सहप्रवाशांनी सीट बेल्ट घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मद्य किंवा इतर कुठल्याही नशेच्या धुंदीत वाहन न चालवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.
२०२४ मध्ये घडलेल्या अपघातांपैकी जास्त अपघात हे संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत घडल्याचे दिसून आले. नोकरदार कार्यालयातून या वेळेत सुटत असल्याने व घरी पोहोचण्याची घाई असल्याने, या वेळेत हे अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.