भक्तमंडळी संकटात सापडली असतील, तेव्हा त्यांनी मनात ‘श्री बोडगेश्वर देवा पावरे’ अशी हाक मारली, तर हा देव पावला अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. आजपर्यंत या श्रद्धेला तडा गेला नाही. उलट ही श्रद्धा जास्त बळकट झाली आहे.

देव बोडगेश्वर संस्थान हे म्हापसा शहरातील अनेक देवस्थानांपैकी एक सुप्रसिद्ध देवस्थान आहे. म्हापसा शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्या दैवताचे स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाही ते भक्तवत्सल, भक्ताभिमानी जागृत दैवत म्हणजेच श्री देव बोडगेश्वर. भक्तांचा रक्षणकर्ता अशी या देवाची ख्याती आहे.
श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाला ९० वर्षे होत असली तरी हे देवाचे स्थळ त्या अगोदरच अस्तित्वात होते, असे सांगितले जाते. आज या ठिकाणी भव्य मंदिर उभे आहे. त्याजागी फार वर्षांपूर्वी बोडगीचे वन होते. म्हणून या देवाला बोडगेश्वर असे संबोधले जाते. याशिवाय तेथे कणकीची झाडेसुद्धा होती. त्याकाळी जाणती मंडळी संध्याकाळी त्या बोडगीच्या वनात येऊन बसायची. तेव्हा त्यांना त्याठिकाणी काहीतरी दैवी शक्तीचा साक्षात्कार जाणवू लागला होता, तेव्हा त्या भक्तमंडळींनी पुढाकार घेऊन छोटी देवळी बांधली. ते रोज तेथे येऊन संध्याकाळी दिवा लावू लागले. रोज दिवा लावणे व गाऱ्हाणे घालणे असा कार्यक्रमच होऊ लागला होता. कालांतराने तेथे भाविकांचा ओढा वाढू लागला. श्री देव बोडगेश्वर यांचे काल्पनिक चित्र रेखाटले गेले आणि ते कणकी-बोडगीच्या झाडाला लावले होते. काही मंडळींनी तेथे त्या झाडाभोवती दगडी पेडाचे बांधकाम केले. पुढे देवस्थान समिती निवडली गेली. तेव्हा त्या जागी एक सुंदर असे छोटे मंदिर उभारण्यात आले. भक्तमंडळी येऊ लागली. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. देव दर्शनासाठी त्यांना श्री देव बोडगेश्वरांच्या अस्तित्वाचा अनुभव येऊ लागला. आपल्या मनातील इच्छा - आकांक्षा तसेच ज्या काही समस्या असतील त्या देवाला सांगितल्यावर पूर्ण होतात, असा विश्वास बसू लागला.
श्री देव बोडगेश्वरांवर असलेली भक्तांची श्रद्धा वाढतच गेली. आपल्या अनेक कामांसाठी भक्तमंडळी नवस बोलू लागले. पुढे त्यांची कामे झाल्यावर नवस फेडण्यासाठी श्री देव बोडगेश्वर मंदिरात येऊन देवकार्य करून नवस फेडू लागले. भक्तांच्या नवसाला पावणारा देव अशी वार्ता सर्वत्र पसरली. दर बुधवार आणि रविवार या दिवशी श्री देव बोडगेश्वर मंदिरात जास्त गर्दी असते. भक्त देवाला पाच केळी, नारळ, फुले, अगरबत्ती अर्पण करतात तर काही भक्त मंडळी त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा नवस बोललेला असेल तर त्याप्रमाणे केळ्यांचा घड, कोंबडा, बोकड तसेच देवाला इतर काही वस्तू अर्पण करतात.
आजच्या युगात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर नेहमीच चर्चा होत असते, पण देव बोडगेश्वर मंदिरात अंधश्रद्धेला थारा नाही. येथे फक्त देवावर श्रद्धा असते. म्हणूनच तर हे देवस्थान सर्व भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. कुठलीही भक्तमंडळी संकटात सापडली असतील तेव्हा त्यांनी मनात या देवाची आठवण करून ‘श्री बोडगेश्वर देवा पावरे’ अशी हाक मारली तर हा देव पावला अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. आजपर्यंत या श्रद्धेला तडा गेला नाही. उलट ही श्रद्धा जास्त बळकट झाली आहे. आपण मंदिरात मूर्ती समोर भक्तीभावाने हात जोडून आपली मनोकामना व्यक्त करतो, आपल्याला देव दर्शनाने समाधान प्राप्त होते. देव देवतांवर असलेल्या श्रद्धेला काही लोक अंधश्रद्धा असे नाव देतात, असे होता कामा नये. श्री देव बोडगेश्वर भक्तांचा रक्षणकर्ता आहे, पूर्वीच्या - काळी पोर्तुगीजांनी गोव्यात प्रवेश करून हळूहळू गोव्यात आपली राजवट प्रस्थापित केली. या राजवटीत त्यांनी बहुतेक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करुन गोव्यातील जनतेवर अत्याचार व बाटाबाटीचे प्रकार सुरू केले होते. हिंदूंची मंदिरे पाडून त्या जागी चर्च उभारायचे, पोर्तुगीजांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. त्याकाळी हिंदूच्या मंदिरातील देव-देवतांना पवित्र ठेवण्यासाठी व बाटाबाटीचे संकट निवारण करण्यासाठी गोव्यातील मंदिरातील देवांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी नेण्यात येत होते. त्याकाळी म्हापशाची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचे स्थलांतर धारगळ या गावात करण्यात आले होते. त्यावेळी श्री शांतादुर्गा देवीने म्हापसा नगरवासीयांचे रक्षण करण्याची जबाबदारी श्री देव बोडगेश्वर यांच्यावर सोपविली होती, असे सांगण्यात येते. त्यासाठी सर्व भक्तांचा तारणहार रक्षणकर्ता श्री देव बोडगेश्वर म्हापसावासीयांचे रक्षण करतो.
श्री देव बोडगेश्वरांचे हे नूतन मंदिर म्हणजे एक अप्रतिम सुंदर कलाकृती आहे. चोहोबाजूंनी खुले असलेले हे मंदिर उत्कृष्ट कलाकुसर केलेल्या खांबावर आधारलेले आहे. पुराणकथेवर आधारित अनेक प्रसंग कोरलेले हे छत आकर्षक दिसते. अशा या विलोभनीय मंदिराच्या मध्यावर असलेल्या चौकोनी चबुतऱ्यावर असलेली श्री देव बोडगेश्वरांची भव्य सुंदर तेजस्वी मूर्ती पाहून भक्तांच्या मनाची प्रसन्नता वाढते.
श्री देव बोडगेश्वर ही एक अगाध शक्ती आहे. या शक्तीचा आजवर अनेक भक्तांना साक्षात्कार झाला आहे. असा अनुभव बहुतेक भक्तांनाही आला आहे. श्री देव बोडगेश्वरांचे महात्म्य सांगणाऱ्या अनेक कथा, आख्यायिका आहेत. ज्याचे मन निर्मल, भावना चांगल्या व प्रामाणिक भक्तांना देव कुठल्याही संकटातून वाचवतो हे कळून येते. श्री देव बोडगेश्वर नवसाला पावणारा जागृत देव असून तो सर्व भक्तांचे रक्षण करतो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो. गोव्याच्या श्री देव बोडगेश्वर संस्थानाची नोंद पर्यटन नकाशावर आली असून या मंदिरात देश-विदेशातील पर्यटक देवाचे दर्शन घेऊन मंदिर पाहण्यासाठी येतच असतात. श्री देव बोडगेश्वरांचे हे मंदिर अप्रतिम, उत्कृष्ट कलाकुसर केलेली एक कलाकृतीच असल्याने पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. सभोवतालचा सुंदर परिसर मनमोहक आहे. श्री देव बोडगेश्वरांच्या जत्रेची महती आणि ओढच अशी की भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्री देव बोडगेश्वरांचे दर्शन घेऊन सर्व भाविक समाधानी होतात.