कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचा निकाल वादात

निकालात फेरफार केल्याचा तीन संस्थांचा गंभीर आरोप; चौकशीचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
35 mins ago
कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचा निकाल वादात

पणजी : गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कला अकादमी’च्या ५८ व्या ‘अ’ गट राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन प्रमुख नाट्य संस्थांनी निकालावर तीव्र हरकत घेत तो अमान्य असल्याचे पत्र अकादमीला पाठवले आहे. या प्रकारामुळे नाट्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, स्पर्धेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कला अकादमीने जानेवारी महिन्यात या स्पर्धेचा निकाल जाहीर केला होता. यामध्ये राज्यातील काही नामवंत संस्थांना पारितोषिक देण्यात आली होती. तसेच नेपथ्य, वेशभूषा आणि ध्वनीसंयोजन यांसारख्या वैयक्तिक विभागांतील बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. मात्र, हा निकाल जाहीर झाल्यापासूनच पक्षपाताचे आरोप होऊ लागले होते. या नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या तीन संस्थांनी अधिकृतपणे, तर काही व्यक्तींनी वैयक्तिक स्तरावर पत्राद्वारे या निकालाचा निषेध केला आहे. यात पारितोषिकप्राप्त विजेत्या संस्थांचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते.
परीक्षकांवर दबावाचा आरोप
या वादातील सर्वात गंभीर बाब म्हणजे निकालात फेरफार करण्यासाठी परीक्षकांवर दबाव आणला गेल्याची चर्चा आहे. अकादमीच्या काही कर्मचाऱ्यांनी परीक्षकांना गाठून निकालात बदल करण्यासाठी आमिषे दाखवली आणि विशिष्ट नाटकांना झुकते माप देण्यासाठी दबाव निर्माण केला. अद्याप याविषयी लेखी तक्रार प्राप्त झालेली नसली तरी, कर्मचाऱ्यांचा यातील सहभाग ही अकादमीसाठी नामुष्की ठरत आहे.
गोव्यातील रंगकर्मींमध्ये या घटनेमुळे नाराजीचे वातावरण असून, स्पर्धेचा दर्जा आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आता कला अकादमीसमोर उभे ठाकले आहे.
अध्यक्षांची भूमिका; चौकशी होणारच!
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, निकालात फेरफार करण्यासाठी परीक्षकांवर दबाव आणल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. याबाबत लेखी तक्रार नसली तरीही, आम्ही या संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, जे कर्मचारी आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वादाची परंपरा कायम
नाट्य स्पर्धेच्या निकालावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही निकालावर हरकत घेत नाट्यलेखक युगांक नाईक यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. यंदा एकापेक्षा जास्त संस्थांनी विरोध दर्शवल्यामुळे कला अकादमीला आता परीक्षकांची नियुक्ती आणि मूल्यमापन पद्धती यावर गांभीर्याने फेरविचार करावा लागणार आहे.