गोवा संरक्षण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार

विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांचे आश्वासन


2 hours ago
गोवा संरक्षण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘इनफ इज इनफ’ संघटनेने जमीन रूपांतरणावर निर्बंध आणून जमिनींचे रक्षण करण्यासाठी तयार केलेल्या विधेयकाच्या मसुद्याला आपला पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने ते विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.
‘इनफ इज इनफ’ संघटनेने विधेयकाचा मसुदा युरी आलेमाव यांच्याकडे सादर केला होता. गोव्याचे संरक्षण करण्यासाठी डोंगर कापणी आणि जमीन रूपांतरणावर निर्बंध आणण्याची मागणी लोकचळवळीच्या माध्यमातून जोर धरत आहे. माजी न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात पणजीत सभा झाली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सभेत मांडलेल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व विविध राजकीय पक्षांना देण्यात आले होते. माजी न्यायमूर्ती रिबेलो यांनी वकील आणि तज्ज्ञांशी चर्चा करून विधेयकाचा मसुदा तयार केला आणि तो राजकीय पक्षांकडे सुपूर्द केला.
प्रादेशिक आराखड्यात दाखविलेल्या ५२६.३१ चौ.कि.मी. सेटलमेंट झोनच्या बाहेर बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे. नगरनियोजन कायद्यातील कलम १७ (२) आणि ३९ (अ) अंतर्गत दिलेले बांधकाम परवाने रद्द करण्याची मागणीही यात आहे. शेतीजमिनीचे अन्य कारणांसाठी रूपांतरण करू नये, शेतीजमीन बाहेरील व्यक्तींना हस्तांतरित करू नये, अशी स्पष्ट तरतूद आहे. यासाठी कलम २२ (अ) समाविष्ट करण्याचा प्रस्तावही मसुद्यात आहे.