शुल्काअभावी केबल्स हवेतच लोंबकळत : अपघातांचा धोका कायम

पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजी शहरात भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यासाठी विशेष डक्ट्स बसवण्यात आले आहेत. मात्र, या डक्ट्सच्या वापरासाठी आकारायचे शुल्क अद्याप निश्चित न झाल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही यंत्रणा सध्या धूळ खात पडून आहे.
डक्ट्स वापरात नसल्यामुळे संपूर्ण शहरात अजूनही ओव्हरहेड केबल्सचे जाळे कायम आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. डक्ट्सच्या वापरासाठी दर निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (IPSCDL) सूत्रांनी दिली आहे.
विद्युत खांबांवर, झाडांवर आणि रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या केबल्समुळे पणजीचे सौंदर्य बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर वीज खात्याने ओव्हरहेड केबल्स कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, वीज खात्याने केबल्स कापल्यानंतर ऑपरेटर त्या पुन्हा जोडतात, ज्यामुळे दोन्ही पक्षांत संघर्ष निर्माण झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून, या वादाचा फटका सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना बसत आहे.
शहरातील हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी रस्ते आणि गटारांच्या कामासोबतच भूमिगत डक्ट्स बसवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे केबल टाकण्यासाठी भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही. रस्त्याच्या एका बाजूने केबल डक्टमध्ये घालून दुसऱ्या बाजूने हव्या त्या ठिकाणी बाहेर काढता येणे यामुळे शक्य होणार आहे.
स्मार्ट सिटीच्या सूत्रांनुसार, डक्ट्स वापरण्यासाठी आकारायचे शुल्क अद्याप अधिसूचित झालेले नाही. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने (IT Department) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे दर निश्चित करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच केबल ऑपरेटरांना भूमिगत डक्ट्स वापरण्याची अधिकृत मुभा मिळेल आणि शहरातील लोंबकळणाऱ्या केबल्सचे जाळे कायमचे नष्ट होईल.