तब्बल साडेसहा वर्षांनंतर मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर

दुबईतील आयुष परिषदेत होणार सहभागी


3 hours ago
तब्बल साडेसहा वर्षांनंतर मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सात वर्षांनंतर विदेशी दौऱ्यावर गेले आहेत. दुबई येथे होणाऱ्या आयुष परिषदेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सोमवारी रात्रीच्या विमानाने ते दुबईला गेले असून परिषदेनंतर ते बुधवारी गोव्यात परतणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुबई येथे जागतिक पातळीवरील आयुष परिषद सुरू आहे. या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी मंडळ दुबईत दाखल झाले आहे. आयुर्वेदिक वैद्यक तज्ज्ञ आणि गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांना परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी मुख्यमंत्री राज्यात उपस्थित नसतील.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी रशियाला भेट दिली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधी मंडळात डॉ. सावंत सहभागी झाले होते. व्यापार क्षेत्रातील संधींचा शोध घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल साडेसहा वर्षांनंतर ते दुसऱ्यांदा विदेश दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली तसेच इतर राज्यांना भेटी दिल्या आहेत. मात्र, विदेश दौरे कमीच केले आहेत.