केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक : हरवळे येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ

महाशिवरात्री महोत्सवात थाटलेल्या दालनातील प्रदर्शनाची पाहणी करताना राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू व इतर.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : तणावग्रस्त जीवनशैलीत अध्यात्मातून जीवनाचे मूळ अर्थ शोधण्याचे सामर्थ्य सिद्ध केलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेने समाजाला जीवनाचा मूळ उद्देश दाखवून दिला आहे. धर्माचे पालन जीवन सुखमय बनविण्याची किमया साध्य केली आहे. महाशिवरात्री महोत्सवाच्या आयोजनातून सात दिवसांत होणारी व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरांतून लोकांना मौलिक मार्गदर्शन होणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेतर्फे हरवळे साखळी येथे ९० वा महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवशक्ती पेट्रोल पंपासमोरील गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या बाजूला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. ब्रह्मकुमारीतर्फे ‘मेरा भारत नशामुक्त भारत’, ‘मेरा गोवा नशामुक्त गोवा’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, शोभा बेहनजी, पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर, डॉ. सचिन परब, नागराज अंकलेकर, संतोष गोसावी आदी उपस्थित होते.
आध्यात्मिकदृष्ट्या माणसाने काय करावे याचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. महोत्सवात थाटलेले प्रदर्शन विद्यार्थ्यांनी पहायला हवे. आध्यात्मिक दृष्टी संस्थेच्या कार्यातून मिळते, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले. अध्यात्म वाढवून सर्वत्र शांतता राबविण्यात मोलाचे प्रयत्न करणाऱ्या अशा संस्थांचे काम महान आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले. सूत्रसंचालन नागराज अंकलेकर यांनी केले. आभार छाया बेहनजी यांनी मानले.
राज्यपालांच्या हस्ते दालनांचे उदघाटन
महाशिवरात्री महोत्सवातील प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू व इतर उपस्थित होते. राज्यपालांना ब्रह्मकुमारीच्या साधकांनी सर्व दालनांची माहिती दिली. राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते १०८ शिवलिंग प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा १४ ते २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सोहळ्यात भव्य शिवलिंग व त्यात ज्योतीस्वरूप महादेवाचे दर्शन घडते. १०८ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे. सात दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.