मांद्रे पोलिसांची कारवाई : स्थानिकांनी मानले पोलिसांचे आभार

हरमल : हरमलमधील (Harmal) स्थानिक ग्रामस्थांच्या इशाऱ्यानानंतर मांद्रे पोलिसांनी (Mandre Police) आक्रमक पावले उचलली आहेत. गेल्या ४८ तासांत पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या धाडींमध्ये एकूण १३ तरुणी (13 young women) आणि दोन दलालांना (Two brokers) ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हरमलवासीयांनी समाधान व्यक्त केले असून, पर्यटन क्षेत्रातील अनैतिक व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.
हरमल ग्रामस्थांनी शनिवारीच पोलीस आणि पंचायतीला निवेदन देऊन या अनैतिक व्यवसायावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत पेडणे पोलीस अधीक्षक सलीम शेख आणि मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम आखण्यात आली.
शनिवारी रात्री ९ वाजल्यापासून सुरू झालेली ही कारवाई रविवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. यात पोलिसांनी ५ तरुणींना ताब्यात घेतले. तर सोमवारी रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी पुन्हा सापळा रचून ८ तरुणींना आणि दोन दलालांना बेड्या ठोकल्या.
दरम्यान, पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल हरमलचे माजी सरपंच इनसियो डिसोझा आणि स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक सलीम शेख व निरीक्षक गिरेंद्र नाईक यांचे आभार मानले आहेत. स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन पोलिसांनी जी तत्परता दाखवली, ती कौतुकास्पद आहे, असे उद्गार ग्रामस्थांनी काढले.
‘त्या’ म्होरक्यावर कारवाई करण्याची मागणी
पोलीस कारवाईत १३ तरुणी सापडल्या असल्या, तरी या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेश्याव्यवसाय गँगचा म्होरक्या मांद्रे बीचवर इतर व्यवसायांच्या नावाखाली आपले अवैध जाळे चालवत आहे. या सूत्रधाराला तत्काळ ताब्यात घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.