कदंब बसच्या धडकेत स्कूटरस्वार वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

आगशी पोलिसांकडून बस चालकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
कदंब बसच्या धडकेत स्कूटरस्वार वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

म्हापसा : गोवा वेल्हा, तीसवाडी येथील भुयारी मार्गावरील जंक्शनवर चुकीच्या दिशेने जात समोरून येणाऱ्या दुचाकीला कदंब बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रशांत गजानन बागकर (५०, बोगदा, मुरगाव) या वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
हा अपघात रविवारी १५ रोजी सकाळी ८.०५ च्या सुमारास घडला. प्रशांत बागकर हा आपल्या जीए ०६ जे ३२७७ क्रमांकाच्या मेस्ट्रो स्कूटरवरून पणजीच्या दिशेने येत होता. तर जीए ०३ एस ०४९६ क्रमांकाची कदंब बस ही विरुद्ध दिशेने जात होती.
अपघातग्रस्त कदंब बस ही घटनास्थळी जंक्शनवर पोहोचताच बस चालक संशयित संकेश भाेसले (५१, रा. हळदोणा-बार्देश) याने निष्काळजीपणे आणि बेधडकरीत्या भरधाव गाडी चुकीच्या दिशेने नेत प्रशांत बागकरच्या दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याला लगेच रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिथे उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आगशी पोलीस हवालदार विनित कुर्टीकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला व त्यास अटक केली. नंतर रात्री उशिरा त्याची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर हे करत आहेत.    

हेही वाचा