हरमलातील वेश्या व्यवसाय बंद न केल्यास कायदा हाती घेऊ!

नागरिकांचा इशारा : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून निवेदनांकडे दुर्लक्ष

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
15th February, 11:54 pm
हरमलातील वेश्या व्यवसाय बंद न केल्यास कायदा हाती घेऊ!

हरमल : येथील खालचावाडा भागात वेश्याव्यवसाय आणि दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे. संबंधितांची नावे पोलीस महानिरीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वीच दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत एस्कॉर्ट साईट आणि वेश्याव्यवसाय बंद न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मांद्रे पोलीस स्थानकात निवेदन सादर केल्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकारांशी संवाद साधला. डिसेंबर महिन्यात लेखी तक्रार देण्यात आली होती. फसवणूक करून आणलेल्या महिलांनी सविस्तर माहिती दिल्याच्या आधारे संबंधितांविरोधात नावे नमूद करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

१४ तारखेला तिघांना संशयाच्या आधारे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हे तिघे घरात घुसून चौकशी करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, त्यांना अटक केल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संबंधित एजंटांना तात्काळ अटक करण्याची मागणी माजी सरपंच डिसोझा यांनी केली. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील आणि पोलीस स्थानकावर मोर्चा काढतील, असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या दोन महिन्यांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मांद्रे पोलीस स्थानकाला कोणतीही माहिती न दिल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा देत एस्कॉर्ट साईट त्वरित बंद करून न्याय द्यावा, अशी मागणी पीटर कार्दोज यांनी केली.

गोव्यातील बायणासारखी परिस्थिती हरमलमध्ये निर्माण होऊ नये, अशी मागणी क्लाऊड फर्नांडिस यांनी केली. सध्या महिलांना सुरक्षित वातावरण नसल्याचा आरोप करत रात्री ८ नंतर पोलीस फौज तैनात करून सुरक्षा द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

वेश्याव्यवसायाबाबत अनेक वेळा पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याने संशय निर्माण होत असल्याचे जॉकी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. पोलिसांनी आठ दिवसांत पूर्णपणे हा व्यवसाय बंद करून आपले निरपराधित्व सिद्ध करावे. गरज भासल्यास संबंधित महिलांना शोधण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे.

यावेळी सुमारे ९० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद फटनाईक यांच्याकडे देण्यात आले. पोलीस स्थानकाच्या आवारात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

सहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप

हरमलमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय सहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चालत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यात मांद्रे पोलीस स्थानकातील चार पोलीस कर्मचारी, एक जेल गार्ड आणि एक वन कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

या टोळक्याचा पोलीस यंत्रणेवर दबाव असल्यामुळेच हा अनैतिक व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणे तालुक्यातील किनारी भागात पर्यटकांच्या घरफोडी प्रकरणांतही याच टोळीचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. घरफोडीसाठी विशेष ‘मास्टर की’ तयार केल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा