‘ईडी’ने अपूर्ण आरोपपत्र सादर केल्याचा दावा करून दाखल केला जामीन अर्ज

हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणी शिवशंकर मयेकरचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
‘ईडी’ने अपूर्ण आरोपपत्र सादर केल्याचा दावा करून दाखल केला जामीन अर्ज

पणजी : हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवशंकर मयेकर याला अटक केली आहे. या संदर्भात अपूर्ण आरोपपत्र दाखल केल्याचा दावा करून मयेकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी मेरशी येथील विशेष न्यायालयात २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

हणजूण कोमुनिदादची सुमारे लाखो चौ. मी. जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याचा दावा करून कोमुनिदादच्या अ‍ॅटर्नीने म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. संबंधित जमीन १९५२ मध्ये बनावट विक्री पत्राद्वारे हडप केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी संशय व्यक्त करून ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली. ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. ईडीने यशवंत सावंत यांच्यासह स्थानिक पंच आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई केली. यात हणजूण कोमुनिदादची १,२०० कोटी रुपये किमतीची ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. त्यानंतर ईडीने १ ऑक्टोबर २०२५ रोजी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला अटक केली होती. याच दरम्यान ईडीने आरोपपत्र ठरल्या मुदतीत दाखल केले नाही. तसेच अपूर्ण आरोपपत्र दाखल केल्याचा दावा करून शिवशंकर मयेकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

हेही वाचा