दूध उत्पादकांची गोवा डेअरीच्या अध्यक्षांकडे मागणी : अंमलबजावणीसाठी आठ दिवसांची मुदत

फोंडा : अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सरकारने नियुक्त केलेल्या गोवा डेअरीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांची भेट घेऊन दूध दरवाढ संबंधी चर्चा केली. गायीच्या दुधात १० रुपये, तर म्हशीच्या दुधात १५ रुपये दर देण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. तर, यावर तोडगा काढण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना दूध दरात वाढ करण्याची मागणी दूध उत्पादकांनी केली आहे. अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येकर, अनुप देसाई, वैभव परब, प्रमोद सिद्धये, संजय प्रभुदेसाई, राजेंद्र देसाई, कृष्णा म्हाळसेकर व दूध उत्पादक यावेळी उपस्थित होते. बुधवारी सकाळी २०-२५ दूध उत्पादकांनी अध्यक्ष पराग नगर्सेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र व कर्नाटकात दूध उत्पादकांना ५ रुपयांपेक्षा अधिक दूध दरात वाढ केली गेल्याने गोव्यात सुद्धा दरवाढ करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या साडेनऊ महिन्यांत गोवा डेअरीने दूध उत्पादकांना दरफरक दिलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालेला आहे. गोवा डेअरीने दूध उत्पादकांचा विचार करून आवश्यक तोडगा काढण्याची मागणी बुधवारी झालेल्या चर्चेत करण्यात आली.
गोवा डेअरीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी यासंबंधी हिरवा कंदील दाखविला असून पुढील ८ दिवसांत निश्चित तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री तसेच सहकार मंत्र्यांनी यापूर्वी दूध उत्पादकांना दरफरक त्वरित देणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण साडेनऊ महिने उलटले तरी अजूनपर्यंत मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दूध उत्पादक पुढील ८ दिवसानंतर ठोस निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे संजीव कुंकळयेकर यांनी सांगितले.
२०२३ सालानंतर दूध उत्पादकांना दरवाढ नाही!
महाराष्ट्र व कर्नाटकात दूध उत्पादकांना दरवाढ करण्यात आली आहे. गोव्यात मात्र २०२३ सालानंतर दूध उत्पादकांना दरवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना गाईच्या दुधात १० तर म्हशीच्या दुधात १५ रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे, असे अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येकर यांनी सांगितले.