वागातोर ड्रग्ज ओव्हरडोस प्रकरण; इंदूरमध्ये ८ पैकी ७ जणांच्या रक्ताचे घेतले नमुने

म्हापसा : वागातोर येथे ड्रग्जच्या अतिसेवनामुळे इंदूर येथील २१ वर्षीय युवक ईशान सिंग बडगुजर याचा मृत्यू झाल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रईथ नाईट क्लब आणि संबंधित गट वास्तव्यास असलेल्या व्हिला व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. तसेच मयताच्या सात मित्रांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
ईशानचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आठही मित्र इंदूरला परतले होते. त्यामुळे हणजूण पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन या मित्रांना नोटीस बजावली. घटनेच्या दिवशी या मित्रांनीही ड्रग्जचे सेवन केले होते का, हे स्पष्ट करण्यासाठी इंदूरमधील एमव्हाय सरकारी रुग्णालयात त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. आठ पैकी एक मित्र शहराबाहेर असल्याने त्याचे नमुने तो परतल्यावर घेतले जाणार आहेत.
रॅपिड बेडसाइड चाचणीमध्ये मयत ईशान सिंग याने दारूसह सहा प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले होते. यामध्ये अॅम्फेटामाइन, मेथॅम्फेटामाइन, एमडीए-एक्स्टसी, कॅनाबिस व बेंझोडायझेपाइन्स या ड्रग्जचा समावेश होता.
नेमकी घटना काय?
ईशान आणि त्याचे आठ मित्र १ एप्रिल रोजी वागातोर येथे एका संगीत पार्टीसाठी गोव्यात आले होते. मात्र, ती पार्टी रद्द झाल्याने हा गट रईथ नाईट क्लबमध्ये गेला. तिथे नाचत असताना ईशान अचानक बेशुद्ध पडला. त्याला पहाटे ३ च्या सुमारास म्हापसा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
सध्या हा गट आपण केवळ बिअर घेतल्याचा दावा करत असला तरी, रक्ताच्या नमुन्यांमधून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तरुणांना इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुणी पुरवले, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान हणजूण पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८ एप्रिल रोजी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.