मडगावात पार्क केलेल्या कारला आग लागून दोन लाखांचे नुकसान

बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 11:09 pm
मडगावात पार्क केलेल्या कारला आग लागून दोन लाखांचे नुकसान

मडगाव : शहरातील उड्डाणपुलानजीक रस्त्याशेजारी पार्क केलेल्या कारला अचानक आग लागली. यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मडगाव शहरातील उड्डाणपुलानजीकच्या राष्ट्रोळी घुमटी असलेल्या परिसरात ही घटना घडली. बसाय फुर्तादो यांच्या मालकीची ह्युंदाई आय-टेन कार रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली होती. अचानक या कारमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कार पार्क केलेली असताना तिला आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दलाच्या माहितीनुसार कारला आग लागून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. 

हेही वाचा