बुटाच्या सॉक्समध्ये दडवून आणला गांजा

म्हापसा : कोलवाळ कारागृहात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या सोमेश मांद्रेकर या पोलीस कॉन्स्टेबलला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. संशयिताला रात्री उशिरा कोलवाळ पोलिसांनी अटक केली, तर गांजा जप्त केला.
हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. संशयित पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या बुटाच्या सॉक्समध्ये गांजा लपवून ठेवला होता. कारागृहाच्या मुख्य गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना तपासणीवेळी हा ड्रग्ज सापडला. नंतर कारागृह प्रशासनाने याबाबतीत कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच पकडलेली गांजाची चार पाकिटे पोलिसांच्या ताब्यात दिली.
दरम्यान, संशयित पोलीस कॉन्स्टेबल जीआरपी विभागात सेवा बजावत होता. तिथून त्याची नियुक्ती कारागृहात करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.