
मडगाव : वेळ्ळी परिसरात भटक्या कुत्र्यावर उकळते पाणी फेकण्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला होता. याप्रकरणी दक्षिण गोवा प्राणी क्रुरता प्रतिबंधक समितीकडून कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार नोंद केली होती. त्यानुसार, कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित लेस्ली रांगेल याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
वेळ्ळीतील कारशेत परिसरात भटक्या कुत्र्यावर उकळते पाणी ओतून त्याला गंभीर जखमी करण्याची घटना घडली होती. ३ एप्रिल रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास कारशेत वेळ्ळी येथील संशयित लेस्ली रांगेल याने ब्रुटस नावाच्या एका भटक्या कुत्र्यावर मुद्दाम उकळते पाणी ओतले. या कृत्यामुळे कुत्र्याच्या अंगावरील केस जळाले. त्याच्या कानाला व त्वचेला गंभीर जखमा झाल्या. याप्रकरणी लेस्ली यांच्या शेजार्यांनी दक्षिण गोवा जिल्हा प्राणी क्रुरता प्रतिबंधक संस्थेशी संपर्क साधला. प्रतिनिधी राज प्रतीक यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर मिळालेल्या माहितीच्या आधारे कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास वेळीप याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.