जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकरांसह पत्नीची निर्दोष मुक्तता

मुलगा गणेशराज नार्वेकरचा बनावट जन्मदाखला प्रकरण


just now
जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकरांसह पत्नीची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : मुलगा गणेशराज नार्वेकर याच्या बनावट जन्म दाखला खटल्यातून गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर व त्यांची पत्नी सुषमा नार्वेकर यांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
जानेवारी १९९५ मध्ये नोंदणी केलेल्या जन्म दाखला अहवालाची बनावटगिरी सिद्ध झालेली नाही. तसेच गोवा क्रिकेट असोसिएशन किंवा शाळेची फसवणूक आरोपीकडून झाल्याचे दाखवणारा पुरावा सरकारी पक्षाने दिलेला नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी नार्वेकर दाम्पत्याला भारतीय दंड संहितेच्या ४६५, ४६८, ४७१ व १२० ‘ब’ कलमांतील गुन्ह्यांतून दोषमुक्त केले. या खटल्यात तिसरे संशयित आरोपी म्हणून म्हापसा पालिकेचे तत्कालीन कारकून रामकृष्ण नाटेकर होते. मात्र खटला सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांना वगळून खटल्याची सुनावणी सुरू होती. हा खटला १३ वर्षे ७ महिने चालला.
काय आहे प्रकरण ?
गोवा क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन कार्यकारिणीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांत २३ डिसेंबर २०१० रोजी गुन्हा दाखल झाला होता.
जून २०१२ मध्ये पोलिसांनी म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले व डिसेंबर २०१२ मध्ये न्यायालयाने आरोप निश्चितीचा आदेश देत खटला सुरू केला.
अॅड. नार्वेकर यांचे पुत्र गणेशराज नार्वेकर यांची १५ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली होती.
२००५-०६, २००६-०७ व २००७-०८ अशी तीन वर्षे त्याची संघात निवड झाली होती.
तिसऱ्या वर्षी त्याला बनावट जन्म दाखल्याच्या आधारे संघात संधी दिल्याचा दावा करत डॉ. साळकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
राजकीय वजन वापरून दाखल मिळवल्याचा आरोप
पर्वरीतील डॉ. चोडणकर यांच्या रुग्णालयात गणेशराज याचा जन्म हा २८ फेब्रुवारी १९९३ रोजी झाल्याची नोंद होती. तर त्याच्याकडे २८ फेब्रुवारी १९९२ रोजी जन्म झाल्याचे प्रमाणपत्र असल्याचा दावा करत या निवडीला डॉ. साळकर यांनी आक्षेप घेतला होता. अॅड. नार्वेकर राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांनी आपले वजन वापरून मुलाचा बनावट जन्म दाखला तयार केल्याचा आरोप साळकर यांनी तक्रारीत केला होता.