यावर्षी १०० दिवसांत ७०४ अपघात : ७० जणांचा मृत्यू, गतवर्षाच्या तुलनेत अपघातांत वाढ

पणजी : गोव्याच्या रस्त्यांवर मृत्यूचे तांडव सुरूच असून, २०२६ या वर्षाच्या पहिल्या १०० दिवसांत (१ जानेवारी ते १० एप्रिल) तब्बल ७०४ अपघातांची नोंद झाली आहे. या भीषण अपघातांमध्ये ७० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, सरासरी दर ३४ तासांत एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांच्या प्रमाणात ८.३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्यात दररोज सरासरी ७ अपघात घडत आहेत. केवळ एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसांचा विचार केल्यास, राज्यात ६५ अपघात झाले असून त्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अतिवेग, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असली, तरी वाहनचालकांची बेफिकिरी आणि खराब रस्ते यामुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.
| तपशील | वर्ष २०२५ (१०० दिवस) | वर्ष २०२६ (१०० दिवस) | फरक (वाढ) |
|---|---|---|---|
| एकूण अपघात | ६५० | ७०४ | +५४ (८.३०%) |
| अपघाती मृत्यू | ६६ | ७० | +०४ (६.०६%) |
| गंभीर जखमी | ९४ | ७५ | -१९ |
| वाहनांचे नुकसान | ३२८ | ४०३ | +७५ |
रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस विविध मोहिमा राबवत आहेत. सीट बेल्ट न लावणे, काळ्या काचांचा वापर आणि ओव्हरस्पीडिंगवर कारवाई केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वाढत्या आकडेवारीमुळे गोव्यातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.