मंदार सुर्लकर खून प्रकरण : मुदतीपूर्वी सुटकेसाठी रोहनची धडपड

पणजी : वास्को येथील डीजे मंदार सुर्लकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी रोहन पै धुंगट याला मुदतीपूर्वी सोडण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. या आदेशाला धुंगट याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी हस्तक्षेप अर्जही न्यायालयात दाखल केला. पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
वास्को येथील मंदार सुर्लकर याचे १४ ऑगस्ट २००६ रोजी अपहरण करण्यात आले. त्याच्या वडिलांकडून ५० लाख रुपये खंडणी उकळण्याचा कट आरोपी रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोविता रायन पिंटो आणि अल सलेटा बेग यांनी आखला होता. त्यानंतर मंदारचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह फोंडा येथील आर्ला-केरी येथे सापडला होता. तत्कालीन पणजी पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करून बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
बाल न्यायालयाने २३ जून २०१४ रोजी रोहन पै धुंगट, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि जोविता रायन पिंटो चार आरोपींना भादंसं कलम १२० (बी), ३६४ (ए), ३०२ आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत प्रत्येकी तिहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. तर अल सलेटा बेग हा माफीचा साक्षीदार बनल्यामुळे त्याला शिक्षा झाली नव्हती. आरोपींनी या शिक्षेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु न्यायालयाने ४ मार्च २०१९ रोजी त्यांची तिहेरी जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने या आरोपींना लवकर मुक्त करण्यासाठी मंजुरी देऊन राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर राज्य सरकारने बाल न्यायालयाचे मत व इतर मुद्द्यांची दखल घेऊन २० ऑगस्ट २०२५ रोजी आदेश जारी करून आरोपींना लवकर मुक्त करण्यास नकार दिला होता.
सरकारने पुन्हा फेटाळला प्रस्ताव
सरकारच्या आदेशला रोहनने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने सरकारची सर्व बाजू एेकून घेऊन पुन्हा निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, सरकारने पुन्हा प्रस्ताव फेटाळून लावला. याला रोहनने न्यायालयात आव्हान दिले. त्याला मंदारच्या वडिलांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.