हडफडे येथील बर्च क्लब अग्नितांडव प्रकरण

म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे मालक लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी फेटाळून लावला आहे.
गुरुवार, दि. १२ रोजी सायंकाळी न्यायालयाने हा निवाडा दिला. सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे आणि संशयितांतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांची टीम न्यायालयात हजर होती. तसेच लुथरा बंधूंचे नातेवाईक उपस्थित होते.
या जामीन अर्जावर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील जेनिफर सांतामारिया यांनी युक्तीवाद केला. त्यांना सरकारी वकील नारायण कळंगुटकर, शिवराम पाटील व हर्षल घाटे यांनी सहकार्य केले. तर संशयितांच्यावतीने वरिष्ठ वकील अॅड. सुबोध कंटक व अॅड. पराग राव यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता. तसेच जोशी कुटुंबीयांच्या हस्तक्षेप अर्जावर अॅड. सुहास जोशी यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, साकवाडी हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री बर्च क्लबमध्ये घडलेल्या या भीषण आग दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ जण पर्यटक तर २० जण क्लबचे कर्मचारी होते.
पीडितांचे वकील अॅड. सुहास जोशी म्हणाले की, म्हापसा न्यायालयाने लुथरा बंधूंचा जामीन अर्ज नामंजूर केल्यामुळे या दुर्घटनेत मरण पावलेल्या २५ जणांच्या कुटुंबियांसाठी हा न्यायाचा दिवस आहे. संशयितांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही यापुढे न्यायालयात प्रयत्न करणार आहे.
अशिलांच्या संमतीनंतरच पुढील निर्णय घेऊ!
संशयितांचे वकील अॅड. पराग राव यांनी निवाड्यावर बोलताना सांगितले की, न्यायालयाने आमचा हा जामीन अर्ज कोणत्या कारणावरून फेटाळला आहे, हे निवाडा प्रत मिळाल्यावर समजेल. त्यानंतर आम्ही त्यावर अभ्यास करू. आमच्या अशीलांच्या संमतीनंतरच वरिष्ठ न्यायालयात या निवाड्याला आव्हान देण्याचा निर्णय घेऊ.