वास्को पोलीस स्थानकात तक्रारी : बँक अधिकाऱ्याच्या नावे अज्ञाताचा फोन

वास्को : एपीके फाईल डाऊनलोड केल्याने येथील दोन व्यक्तींना सुमारे ४ लाख १४ हजार रुपये गमावावे लागले. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडवेल वास्को येथील एका व्यक्तीला ७ फेब्रवारील एका अज्ञाताने फोन करून आपण बँक अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर एक अॅप डाऊनलोड करण्याची विनंती करून एपीके फाईल पाठविली. या फाईलमुळे बँकेचे व्यवहार सुरळीतपणे करण्यास मोठी मदत होईल असे त्याने सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने ती फाईल डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड करताच त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम वजा होत असल्याचे संदेश येऊ लागले. आपली २ लाख ३० हजार ९४८ रुपयांची फसवणूक झाल्याने त्या व्यक्तीने वास्को पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी उपनिरीक्षक मयुर सावंत पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात धाकतळे वास्को येथील एका व्यक्तीला ७ फेब्रुवारीला एका अज्ञाताने आरटीओ ई-चलनाची एक एपीके फाईल पाठविली. त्या फाईलमध्ये त्या व्यक्तीच्या भावाचा फोटो असल्याने त्या व्यक्तीने ती फाईल उघडली. त्यामुळे त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून १ लाख ८३ हजार ६०० रुपये वजा झाले. याप्रकरणी त्या व्यक्तीने वास्को पोलिसांकडे तक्रार केली. उपनिरीक्षक प्लेटो कार्वालो पुढील तपास करीत आहेत.