मिराबाग बंधाऱ्याविरोधातील आंदोलनाला वाढते समर्थन

चौथ्या दिवशी विविध समाज कार्यकर्त्यांनी भेट देऊन केली चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
मिराबाग बंधाऱ्याविरोधातील  आंदोलनाला वाढते समर्थन

सांगे : मिराबाग-सावर्डेतील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात सुरू असलेले धरणे आंदोलन शुक्रवारी चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले. या आंदोलनाला शंकर पोळजी, ॲड. प्रतिमा कुतिन्हो, सांगेचे नगरसेवक मॅश्यू डिकॉस्टा आणि अँथनी फर्नांडिस या समाज कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

हा २८० कोटी रुपयांचा हा बंधारा आहे की मिनी धरण, हेच कोणाला समजत नाही. बंधाऱ्याच्या नावाखाली लोकांना संकटात टाकून आपले खिसे भरू पाहणाऱ्या पुढाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन परिस्थिती पाहावी, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

स्थानिक आमदार गणेश गावकर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकांनी केला. सावर्डेच्या आमदारांसह कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सांगेचे आमदार तसेच समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मनावर घेतले, तर हा बंधारा येथून नक्कीच हटवला जाईल, असे स्थानिकांनी सांगितले.

गेली दीड वर्षे सरकारने लोकांची झोप उडवली आहे. आता गेल्या चार दिवसांपासून संसार उघड्यावर ठेवून लोकांवर रस्त्यावर येण्याची पाळी आणली आहे. कितीही त्रास सोसावा लागला तरी चालेल, पण बंधारा इथून गेल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.

मॅश्यू डिकॉस्टा यांनी सांगितले की, जे लोक आंदोलनाच्या वेळी तुमच्याबरोबर राहतात, त्या लोकांना लक्षात ठेवले पाहिजे. पण तसे होत नाही. लोक सरकारविरुद्ध आंदोलन करतात व परत त्यांनाच निवडून देतात.

अँथनी फर्नांडिस म्हणाले की, कोणताही प्रकल्प राबवताना गावाला विश्वासात घेणे गरजचे आहे. सरकारच्या समर्थकांनी येथे येऊन निरीक्षण करण्याची गरज आहे.

स्थानिक आमदारांनी लक्ष द्यावे!

यावेळी ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी लोकांना रस्त्यावर उतरण्याची पाळी येते. हा बंधारा कोणासाठी? याचा फायदा कोणाला? गावातील १६० घरे उद्ध्वस्त होणार, किनाऱ्यालगतच्या गावाला याचा फटका बसणार, संगमेश्वर मंदिर बुडून जाणार याची कल्पना असूनही सरकार असे का वागते? खरे तर आमदार गणेश गावकर यांनी येथे यायला हवे होते. लोकांचे गाऱ्हाणे ऐकून घ्यायला हवे होते, असे कुतिन्हो म्हणाल्या.

हेही वाचा