खात्यांतर्गंत समन्वयासाठी सचिवांची नेमणूक

पणजी : केंद्रीय अर्थसंकल्पाचा आढावा घेण्याबरोबरच राज्याच्या अर्थसंकल्पाच्या (Budget) तयारीसाठी मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी खात्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली.
विविध खात्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी सचिवांची नेमणूक केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ ते २७ मार्च पर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पहिल्याच दिवशी म्हणजे ६ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.
मात्र, विधानसभा अधिवेशनाचा (Assembly session) कार्यक्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक अजून झालेली नाही. अर्थसंकल्पाची तयारी वेगाने सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या धर्तीवर गोव्याचा अर्थसंकल्प असणार. केंद्राकडून राज्याला किती निधी मिळणार; त्याप्रमाणे विविध खात्यांसाठी निधीची सोय करण्यात येणार आहे.
यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील योजना तसेच निधीचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, पाणीपुरवठा खाते अशा विविध खात्यांचा एकमेकांकडे संबंध येतो. योजना व निधीची सोय करताना याचा विचार करावा लागतो. त्यासाठी अर्थसंकल्पासाठी विविध खात्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी विचारविमर्ष झाला.
समन्वय साधण्यासाठी सचिवांची नेमणूक करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन १४ दिवसांचे असणार. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने; चर्चेसाठी आवश्यक वेळ मिळणार नसल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.