
मडगाव: ओला इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भावेश अग्रवाल यांच्या विरोधात दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ग्राहक आयोगाकडे दाखल असलेल्या तक्रारीवर वारंवार नोटीस देऊनही ते सुनावणीस हजर न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रीतेश चंद्रकांत घाडी यांनी 'ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' विरोधात दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भावेश अग्रवाल यांना यापूर्वी अनेकदा कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटीस मिळूनही त्यांनी आयोगासमोर हजेरी लावली नाही. त्यामुळे मडगाव येथील दक्षिण गोवा ग्राहक आयोगाने आता अग्रवाल यांना आयोगासमोर हजर करण्यासाठी बंगळुरू शहर पोलिसांना जामीनपात्र वॉरंट बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
या जामीनपात्र वॉरंटसाठी १,४७,४९९ रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचा एक हमीदार सादर करावा लागणार आहे. आयोगाने अग्रवाल यांना २३ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले असून, त्यांच्या उपस्थितीत पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
ओला इलेक्ट्रिकला यापूर्वीही ग्राहक हक्कांचे उल्लंघन, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि निकृष्ट सेवा या कारणांमुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (CCPA) कारणे दाखवा नोटिसा मिळाल्या आहेत. तसेच, कंपनीच्या सर्विस सेंटरमधील (Service Centers) ढिसाळ कारभारामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे दिसून येत आहे.