बिलिंग कर्मचाऱ्यांना रात्री ९ वाजेपर्यंत काम करण्याची सक्ती

पणजी : वीज खात्याने (Goa electricity department) वीज बिलांच्या (electricity bill) वसुलीचे जे उद्दिष्ट ठेवले होते, ते अर्थसंकल्प जवळ आला तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खात्याने कठोर उपाययोजना आखल्या असून, बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांना रात्री ९ वाजेपर्यंत काम करण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भातील परिपत्रक मुख्य वीज अभियंत्यांनी जारी केले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ मार्चपासून सुरू होणार आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने सरकारने खात्यांमार्फत जमा झालेल्या महसुलाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. वीज खात्याची बिलांच्या माध्यमातून येणारी वसुली कमी झाली आहे. वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभियंते तसेच बिलिंग विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना आता जादा वेळ कार्यालयीन काम करावे लागणार आहे. या विषयीचे परिपत्रक मुख्य वीज अभियंत्यांनी जारी केले आहे.
परिपत्रकातील महत्त्वाच्या बाबी
- वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना रजा घेता येणार नाही. ज्यांनी आधीच रजा घेतली आहे, त्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात यावे.
- सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून काम पूर्ण करावे लागेल.
- वीज बिले देण्यासाठी वाहनांचा वापर सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत करावा लागणार.